हुन्नुरगी (कर्नाटक) गावातील बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले !
समाजाला धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे सांगणारी घटना
बेळगाव – निपाणी तालुक्यातील हुन्नुरगी गावातील मानव बंधुत्व वेदिकेचे कार्यकर्ते बाळू बरगाले यांनी त्यांच्या नातवाचे नामकरण स्मशानभूमीत केले. या कार्यक्रमाला कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीतील बारशाचा उपक्रम हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. लोकांनी श्रद्धेचे बाजारीकरण केल्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे.’’ या वेळी माजी आमदार काका पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले. (नामकरण हा सोळा संस्कारांपैकी एक विधी असून तो आयुष्याची वाढ, इतर सर्व व्यवहार सिद्ध होण्यासाठी आणि परमेश्वराशी प्रीती निर्माण होण्यासाठी केला जातो. असा संस्कार केल्याने त्या जिवावर सात्त्विक संस्कार होत असल्याने हा विधी घर, देवालय, आश्रम, तसेच सात्त्विक ठिकाणीच होणे अपेक्षित आहे. याउलट स्मशान ही जागा रज-तम यांनी प्रदूषित असते. यामुळे नामकरण होणार्या लहान बाळास, तसेच अन्य सर्वांना या ठिकाणी त्रास होऊ शकतो. या उदाहरणावरून समाजात धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच लक्षात येते ! – संपादक)