श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींगची आवश्यकता नाही
ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन दर्शन पास बुकींग करून येणार्या भाविकांनाच विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन प्राप्त होईल, अशी अट श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने ठेवली होती; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने ऑनलाईन दर्शन पास बुकींगची अट मंदिर समितीने रहित केली आहे.
१. २० जानेवारीपासून ओळखपत्र दाखवून मंदिरात सर्वांना प्रवेश देण्यात येत आहे; मात्र कोरोनाविषयीची सर्व नियमावलीचे पालन करण्यात येणार आहे. लहान मुले, ६५ वर्षांपुढील नागरिक, तसेच गर्भवती महिला यांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
२. पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पास बुकींगही भाविकांना करता येणार आहे. त्यामुळे भाविक त्यांच्या वेळेनुसार ऑनलाईन पास बुकींग करून दर्शनासाठी येऊ शकतात. दर्शन पासवर नमूद केलेल्या वेळेत त्यांना दर्शन घेण्याची व्यवस्था करता येणार आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.