हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’!
२३ जानेवारी २०२१ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने…
हिंदुस्थान हे राष्ट्र केवळ असंख्य, पराक्रमी अशा सशस्त्र क्रांतिकारकांच्या बलीदानाने स्वतंत्र झालेले आहे. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असलेले आणि जागतिक स्तरावरचे स्वातंत्र्ययुद्ध घडवून आणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचे शिल्पकारच होते.
१. नेताजींची देशभक्ती आणि स्वाभिमान
‘वर्ष १९०२ ते १९१३ या कालावधीत शाळेत असतांना मुख्याध्यापक वेणीबाबू यांच्या मार्गदर्शनामुळे सुभाषचंद्र बोस यांच्या मनात स्वातंत्र्याच्या होमकुंडात समर्पित होणारे देशभक्त आणि आक्रमक विचार यांचे बीजारोपण झाले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक साहित्य वाचले. देशासाठी ऐहिक सुखाचा त्याग करायचे ठरवले. कोलकाता (कलकत्त्यात) येथे आलेल्या कॉलरा रोगाच्या साथीला तोंड देण्यासाठी त्यांनी एका समाजसेवी संस्थेतून सहस्रो लोकांना साहाय्य केले. सुभाषबाबूंच्या मनात देशाभिमान धगधगत होता. एकदा वर्गात शिकवणार्या युरोपियन प्राध्यापकाने ‘भारतीय लोक कुत्रे आहेत’, असे विधान करताच सुभाषबाबूंनी त्यांच्या कानशिलात भडकावली आणि ‘भारतीय कुत्रे नसून वाघ आहेत’, हे दाखवून दिले. इंग्रजांनी घडवून आणलेल्या ‘जालियनवाला बाग हत्याकांडाने’ सुभाषबाबूंना प्रचंड संताप आला आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.
२. नेताजी सुभाषचंद्रबोस यांनी ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करून केलेले क्रांतीकार्य !
जर्मनीमध्ये असतांना सुभाषबाबूंनी मातृभूमीच्या उद्धारासाठी कटीबद्ध असलेल्या शेकडो भारतीयविरांना एकत्र केले आणि २६.१.१९४२ या दिवशी त्या सर्व सैनिकांनी ड्रेस्टन येथे ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. ते स्वतः या सेनेचे सरसेनापती होते. या सैन्याला युद्धशिक्षण देण्यात आले. आझाद हिंद सेनेचे सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर हिटलरने त्या सेनेची पहाणी केली. त्या वेळी त्याने सुभाषबाबूंचा गौरव ‘स्वतंत्र हिंदुस्थानचे अध्यक्ष हिज एक्स्लन्सी सुभाष’, असा अभिमानाने केला.
दुसर्या महायुद्धात जर्मनीची युद्धाची बाजू कमकुवत ठरत असतांनाच नेताजींनी जर्मनीहून हॉलंडमार्गे एका पाणबुडीतून टोकियोला प्रयाण केले. त्यांनी तेथेही जनसंघटन करून स्वातंत्र्यलढा चालूच ठेवला. सहस्रो लोक विदेशातही आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. २५.८.१९४३ या दिवशी त्यांनी ‘आझाद हिंद सेनेची’ अधिकृत स्थापना केली. मलाया आणि ब्रह्मदेश येथील लाखो देशप्रेमी नागरिकांनी सुभाषबाबूंच्या देशकार्यासाठी कोट्यवधी रुपये दान केले.
३. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांनी प्रभावित झालेले नेताजी बोस
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर आणि सुभाषबाबू यांची वर्ष १९४० मध्ये मुंबईत भेट झाली. सावरकर यांनी सुभाषबाबूंना सल्ला दिला की, जर्मनी आणि इटली येथील ब्रिटीश सैन्यात अनेक हिंदुस्थानी सैनिक एकत्र करून आपण मोठे सैन्य सिद्ध करावे अन् स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा द्यावी. पूर्ण स्वराज्य घोषित करावे. ब्रिटिशांवर बर्मा (ब्रह्मदेश) आणि बंगालचा उपसागरातून आक्रमण करावे. हिंदुस्थान स्वतंत्र होईल. सावरकर यांच्या तेजस्वी विचारांनी सुभाषबाबू प्रभावित झाले. सशस्त्र क्रांती, सैनिकीकरणाने स्वातंत्र्य, जहालमतवाद, पराक्रम, आत्मरक्षण, ब्रिटिशांशी अहिंसेने तडजोड न करणे या काही सूत्रांवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी बोस यांच्यात एकमत झाले.’
– प्रा. गजानन नेरकर (संदर्भ : मासिक ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २०१४)