मेट्रो कारशेडविषयी अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल ! – फडणवीस
मुंबई – ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेचीच जागा योग्य आहे. पण या प्रकरणी अधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल होत आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याविषयी एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘मेट्रो ३’च्या कारशेडची जागा पालटण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला आहे. त्यासाठी अहवाल सिद्ध करून नवीन समितीचा निवळ फार्स करण्यात येत आहे. यातून मेट्रो प्रकल्प रखडेल आणि राज्याचीही मोठी आर्थिक हानी होईल. खासगी विकासकांना मोठे आर्थिक लाभ देण्यासाठी सुद्धा हालचाली होत आहेत. हा प्रकार उघडकीस येईल, तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, अशी चेतावणी फडणवीस यांनी या पत्रात दिली आहे.
कारशेड कांजूरमार्गला नेले, तर आरेपेक्षा तीनपट अधिक झाडे तोडावी लागतील. केवळ जागा पालटण्याच्या अट्टहासापोटी सहस्रो कोटींची हानी होईल, असे फडणवीस यांनी यात नमूद केले आहे.