कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नाशिक येथे ५ घंट्यात ४१ शस्त्रक्रिया आटोपल्या; रुग्णांची हेळसांड !
स्वतःच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अशा रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या पाट्याटाकू अधिकार्यांवर कडक कारवाई केली, तर पुढे असा हलगर्जीपणा करण्यास कोणी धजावणार नाही !
नाशिक – कुटुंब कल्याण नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी एकाच दिवसात ४१ महिलांवर अवघ्या ५ घंट्यात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूलजवळील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली आहे. शस्त्रक्रियेनंतर वॉर्डमध्ये अपुरी जागा असल्याने तसेच पुरेशा खाटा नसल्याने लादीवरच या महिलांना अंथरूण टाकावे लागले. त्यामुळे कोरोनाकाळात शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपांजली माळेकर यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नसबंदीसाठी क्षमतेपेक्षा अधिक मातांना आणून त्यांच्या जिवाशी खेळ खेळला आहे. शासनाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी तत्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीराम पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिली.