बंगालमध्ये भाजपच्याच २ गटांत हाणामारी !
तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना मूळ भाजपवासियांकडून विरोध !
अशा प्रकारे हाणामारी केल्याने जनता कधीतरी मत देईल का ? तृणमूल काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते त्यांच्या मूळ हिंसाचारी वृत्तीचा त्याग करणार आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित होतो !
कोलकाता (बंगाल) – येथे २१ जानेवारीच्या दिवशी भाजपच्या कार्यालयात त्याच्या कार्यकर्त्यांच्या २ गटांत जोरदार हाणामारी आणि जाळपोळ झाली. या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या. मूळ भाजपवासीय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते यांच्यात ही हाणामारी झाली. हाणामारीचे हे प्रकार २ ठिकाणी घडले. एक हाणामारी राज्यातील आसनसोलमधील भाजपच्या कार्यालयात झाली. या वेळी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो आणि राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन हेदेखील उपस्थित होते. (मंत्र्यांच्या उपस्थितीत हाणामारी करणारे कार्यकर्ते किती बेशिस्त आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)
(सौजन्य : Nation Today)
दुसरी हाणामारी बर्दवान येथे झाली. काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नंदी यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्यात वाद होऊन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. या कार्यकर्त्यांनी एक टेम्पो आणि अनेक दुचाकी वाहने पेटवून दिली. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांसमवेतही हाणामारी केली. या घटनेत ४ जण घायाळ झाले, तर ७ जणांना अटक करण्यात आली. (पोलिसांनाही न ऐकणारे कार्यकर्ते कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ? – संपादक)