आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अजून निर्णय नाही ! – राजेश पाटणेकर, सभापती, गोवा विधानसभा

राजेश पाटणेकर

पणजी, २१ जानेवारी (वार्ता.) – आमदार अपात्रता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने या प्रकरणावर अजून निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी येथे पत्रकारांना दिली.

काँग्रेसचे १० आमदार आणि मगोपचे २ आमदार यांनी गतवर्षी त्यांच्या संबंधित पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसने पक्षातील बंडखोर १० आमदारांच्या विरोधात जुलै २०१९ मध्ये गोवा विधानसभेच्या सभापतींकडे अपात्रता याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी निर्णयास विलंब होत असल्याने काँग्रेसने गोवा विधानसभेच्या सभापतींना या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने घेण्याची सूचना करण्यासंबंधीची मागणी करणारी याचिका चालू वर्षी जानेवारी मासात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

विधानसभा अधिवेशनात १० विधेयके, ५ खासगी ठराव आणि ७५१ प्रश्‍न मांडण्यात येणार

२५ जानेवारीपासून प्रारंभ होणार्‍या चार दिवसीय गोवा विधानसभा अधिवेशनात एकूण १० विधेयके, ५ खासगी ठराव आणि ७५१ प्रश्‍न मांडले जाणार आहेत. यामधील १० पैकी ६ शासकीय विधयके आहेत. ७५१ प्रश्‍नांपैकी १९५ प्रश्‍न तारांकित, तर उर्वरित ५५६ प्रश्‍न हे अतारांकित आहेत, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी दिली.