मराठी भवनावरील आक्रमण खपवून घेणार नाही ! – मराठीप्रेमींची पेडणे येथील बैठकीत चेतावणी
पेडणे, २१ जानेवारी (वार्ता.) – काही मराठीद्वेष्ट्यांनी पर्वरी येथील मराठी भवनावर आक्रमण करून ‘जनमत कौल’ साजरा केला. असा प्रकार पुन्हा घडल्यास तो खपवून घेणार नाही, अशी चेतावणी पेडणे येथे मराठीप्रेमींच्या बैठकीत देण्यात आली. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीपूर्वी मराठी राजभाषा न केल्यास मतदानात ‘नोटा’चा वापर केला जाईल, असेही मराठीप्रेमींनी बजावले आहे. या बैठकीत गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री. प्रदीप घाडी आमोणकर, सर्वश्री राजाराम पाटील, नरेंद्र आजगावकर, किशोर कोचरेकर, गोकुळदास घाटकळ, निवृत्ती शिरोडकर, मच्छिंद्र च्यारी आदींची उपस्थिती होती.
श्री. मच्छींद्र च्यारी म्हणाले, ‘‘मराठी भवनावर आक्रमण करणार्यांनी आत्मपरीक्षण करावे. योग्य वेळी याचे प्रत्युत्तर दिले जाईल. येथे पोर्तुगीज येण्यापूर्वीही मराठी संस्कृती होती, याची प्रत्येकाने जाणीव ठेवावी. राजकारण्यांनी मराठीचा घात केला आहे आणि त्यामुळे मराठीला मानाचे स्थान देण्यासाठी पुन्हा प्रखर चळवळ उभारणे आवश्यक आहे.’’
बैठकीत एकंदरित पुढील सूर उमटला. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मराठीप्रेमींची फसवणूक केली आहे. मराठी अकादमीवर घोटाळ्याचे बिनबुडाचे आरोप केले. मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे, यासाठी नव्याने चळवळ उभारली जाईल.