भूमीगत पाण्याच्या स्रोतांचा आढावा घ्या ! – आमदार वैभव नाईक
सिंधुदुर्ग – पाणी हा गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यामध्ये असलेल्या भूमीगत पाण्याच्या स्रोतांचा आढावा घ्यावा आणि जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कशा प्रकारे करता येईल, याचे नियोजन करावे, अशी सूचना शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘जल जीवन मिशन’च्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिली.
‘जनतेला गुणवत्तापूर्ण आणि सातत्याने पाणीपुरवठा करणे’ हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने अधिकाधिक गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेथे पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, तेथे जलवाहिनीसाठी खर्च करावा. यासाठी सर्वेक्षण करून अहवाल सिद्ध करावा. सिंधुदुर्ग किल्ल्यावरही पाणीपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव बनवावा. त्यासाठी समुद्रात खांब (पिलर) उभे करून त्यावरून जलवाहिनी टाकता यावी, यासाठीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या.