दिग्दर्शक अली जफर यांसह ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून संमत
‘तांडव’ वेब मालिकेत हिंदु देवतांचा अवमान झाल्याचे प्रकरण
मुंबई – ‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि ‘अॅमेझॉन प्राइम’च्या प्रमुख अपर्णा पुरोहित या ४ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने २० जानेवारी या दिवशी समंत करून ३ आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिला आहे. उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये झालेल्या फिर्यादी प्रकरणात स्थानिक न्यायालयात नियमित अटकपूर्व जामीन अर्ज करता यावा यासाठी उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांपुरते या सर्वांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यामुळे मुंबईत आलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांना तूर्त अटकेची कारवाई करता येणार नाही. ‘तांडव’ वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांसाठी उत्तर प्रदेशात गुन्हा नोंद झाला असून पुढील कारवाईसाठी लखनौ येथून पोलीस मुंबईत आले आहेत.
१. ‘‘तांडव’ वेब सिरीजमधील कथित आक्षेपार्ह दृश्य हे आम्ही हटवले आहे. ते आक्षेपार्ह आहे, असे मान्य करून नव्हे; पण आम्हाला हा वाद पुढे वाढू द्यायची इच्छा नाही म्हणून ते हटवले आहे’, अशी माहिती अर्जदारांच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता आबाद पोंडा यांनी न्यायालयात न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर दिली.
२. त्यावर ‘आरोपींनी येथे उच्च न्यायालयात असा अर्ज करण्याऐवजी उत्तरप्रदेशात लखनौमधील हजरतगंज न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करायला हवा’, असे म्हणत सरकारी अधिवक्ता योगेश नाखवा यांनी दिलासा देण्यास विरोध दर्शवला.