गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

​२१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग ९)

भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://sanatanprabhat.org/marathi/443572.html


सौ. मंगला मराठे

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती !

१३ आ. मराठे कुटुंबावर असलेली परात्पर गुरुदेवांची प्रीती !

१. एकदा माझी विदेशातील बहीण आमच्याकडे आली होती. तेव्हा त्यांनी मला बोलावून तिला आवडेल असा खाऊ दिला.

२. एकदा यजमान एप्रिल मासात उत्तर भारतातून गोव्यात १० दिवसांसाठी आले होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्यासाठी पिकलेले आंबे पाठवले होते. वास्तविक आमच्या आमराईत भरपूर आंबे लागतात आणि ते आम्ही आश्रमात पाठवतो; पण ते मे मासाच्या अखेरीस येतात. ‘ते आंबे येण्यापूर्वीच यजमान अध्यात्मप्रसारासाठी परत उत्तर भारतात परत जाणार’, हे लक्षात ठेवून त्यांनी त्यांच्यासाठी आंबे पाठवले होते. आपण असा इतका व्यापक विचारही करू शकत नाही.

३. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी यजमान अध्यात्मप्रसारासाठी बाहेर असतांना त्यांना प्रसाद पाठवला; मात्र त्या प्रसादाच्या खोक्याला गुंडाळलेल्या कागदावर त्यांनी ‘सौ. मंगला मराठे यांच्याकडून’, असे लिहायला लावले होते.

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला एका सेवेसाठी विशेष प्रकारचा खाऊ दिला. तो वैशिष्ट्यपूर्ण असा खजूर पानांचा डबा होता. मी दुसर्‍या दिवशी त्या डब्यातील अर्धी पाने परात्पर गुरु डॉक्टरांना दिली. त्यांनी चवीपुरते ते तोंडात घातले आणि कौतुकाने म्हणाले, ‘‘छान आहे ना ! म्हणूनच तुला दिले. चांगले ते दुसर्‍यांना द्यायचे.’’

५. यजमान सतत अध्यात्मप्रसारासाठी भारतभर फिरतीवर असायचे आणि धामसे येथील वास्तू ही १३ एकराच्या भूमीवर मधोमध होती. तेव्हा आमच्या घराच्या आजूबाजूला वस्तीही नव्हती. वीजही सतत जात होती. ही गोष्ट लक्षात घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःहून तिथे एक लहान जनरेटर घेऊन दिला.

६. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्ही पूर्णवेळ साधना चालू केल्यावर आम्हा दोघांना आणि मुलांना विविध मंगल प्रसंगी भेट म्हणून वस्त्रे दिली आहेत, उदा. मला साडी आणि अपर्णाला पोषाखाचे कापड दिले. इतकेच नव्हे, तर परात्पर गुरु डॉक्टर पोलके आणि पोषाख शिवण्यासाठी शिलाईचे पैसेही पाकिटात घालून देत होते. एवढा खोलवर विचार केवळ प्रीतीस्वरूप देवच करू शकतो.

१३ इ. कुटुंबप्रमुखाप्रमाणे सगळ्यांची काळजी घेणे

१३ इ १. यजमानांचे वाहन जुने झाल्यामुळे प्रसारासाठी उपयुक्त नसणे आणि दोघेही पूर्ण वेळ साधना करत असल्यामुळे थोडीशी जमीन विकून नवीन वाहन घ्यायचे ठरवणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना हे माहित नसूनही आश्रमातील वाहन वापरण्यास सांगणे : आम्ही दोघेही पूर्ण वेळ साधना करू लागलो होतो. यजमानांचे वाहन जुने झाले होते. त्यामुळे प्रसारासाठी ‘मायलेज’च्या दृष्टीने ते वापरता येत नव्हते. तेव्हा ते इतर सेवाकेंद्रात पाठवण्यात आले; म्हणून आम्ही दोघांनी विचारविनिमय करून जमिनीचा एक लहान तुकडा विकून अध्यात्मप्रसारासाठी एक नवीन वाहन घेण्याचे ठरवले. हे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगायला आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा आम्ही काही बोलण्यापूर्वीच ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हाला एक वाहन घेऊन द्यायला हवे. तुम्हाला अध्यात्मप्रसारासाठी पुष्कळ फिरावे लागते ना !’’ अशा प्रकारे त्यांनी आमच्या मनातील जाणले; परंतु त्यांनी आम्हाला वेगळे वाहन घेऊ दिले नाही. ते म्हणाले, ‘‘आपल्या आश्रमातील वाहन घ्या ना !’’ तेव्हा ‘धामसे येथे राहिल्यास २ दिवस वाहन तेथेच ठेवावे लागते’, असे आम्ही सांगितल्यावरही ते म्हणाले, ‘‘काही हरकत नाही. आपल्याकडे किती तरी वाहने आहेत !’’

१३ ई. घराण्याला असलेल्या तीव्र आध्यात्मिक त्रासापासून कुटुंबाला मुक्त करणे : आमच्या मराठे घराण्याच्या ३ पिढ्यांना करणीचा तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्याची लक्षणे आमच्या सध्याच्या पिढीतही दिसून येतात. ईश्‍वराच्या कृपेनेच आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले भेटले आणि आमची साधना चालू झाली. परात्पर गुरु डॉक्टरांनी यजमानांना काही विधीही करायला लावले. त्यांनी यजमानांना सासूबाईंचे (यजमानांच्या आईचे) निधन झाल्यावर ६ मास त्यांच्यासाठी दत्ताचा नामजप करायला लावला आणि त्यांच्याशी असलेला देवाण-घेवाण हिशोब संपल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी धामसे येथील वास्तूसाठी वेगळी स्थानदेवता स्थापन केली. त्यानंतर एक दिवस ते सहज म्हणाले, ‘‘तुम्हाला त्या घराण्यातून मुक्त केले. मराठे कुटुंबाला किती त्रास आहे ना !’’

१३ उ. ‘धामसे येथील घर हा आपलाच आश्रम आहे’, असे सांगणे : वर्ष १९९८  पासून धामसे येथील घरात सनातनचा आश्रम चालू केला होता. तेथे सनातनचे विविध उपक्रमही राबवले गेले होते. पूर्वी तेथे साधकांचे वास्तव्य होते. अनेक संतांचे चरणस्पर्श त्या वास्तूला झाले होते; परंतु सध्या ती वास्तू विनावापर आहे. एकदा तेथे नामपट्ट्यांचे छत लावायचे होते. आम्हाला ते लावणे शक्य नव्हते; म्हणून आम्ही त्यासाठी साहाय्य मागितले. आता तेथे कुणीही रहात नाही; म्हणून दायित्व असलेल्या साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘धामसे येथे वास्तूछत लावण्यासाठी वेळ द्यावा का ?’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘हो लावायचे ना ! तो आपलाच आश्रम आहे’’, असे उत्तर दिले.

१३ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची समष्टीवरील प्रीती !

१३ ऊ १. साधकांची आवड लक्षात त्यांना खाऊ देणे : परात्पर गुरु डॉक्टर ‘साधकांना कोणता खाऊ आवडतो ? तिखट कि गोड ?’ हे जाणून घेऊन खाऊ देतात आणि खाऊचे पाकीट उघडल्यावर शिल्लक खाऊ मऊ पडू नये, यासाठी पाकिटाला लावण्यासाठी न विसरता ‘यू’ पिनही देतात.

१३ ऊ २. साधकांवर उपचार करणारे समाजातील आधुनिक वैद्य, साधकांना साहाय्य करणारे समाजातील हितचिंतक आणि समाजातील तत्सम परिचित व्यक्ती यांना ते विशेष प्रसंगी अन् सणावारी आवर्जून प्रसाद पाठवतात.

१३ ऊ ३. धामसे येथे मुलांना सांभाळणार्‍या सेविकेला त्रास होऊ लागल्यावर ‘तिच्यासाठी नामजपादी उपाय करणे, हे आपलेच दायित्व आहे’, असे सांगून त्यांचे उपायांचे नियोजन करणे : आम्ही धामसे येथे घरात अपर्णा आणि केदार यांना सांभाळण्यासाठी एक सेविका ठेवली होती. मुले साधकांसमवेत राहिली, तरी मुलांचे सर्व वैयक्तिक ती सेविका करत होती. तिने नामजपाला आरंभ केल्यावर तिला वाईट शक्तींचा तीव्र त्रास होऊ लागला होता. त्या वेळी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना नामजपादी उपायांसाठी एका संताकडे पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी आवर्जून त्या सेविकेचेही नामजपादी उपायांसाठी जाण्याचे नियोजन करण्यास सांगितले आणि ते म्हणाले, ‘‘अपर्णा आणि केदार यांना तुम्ही नसतांना ती सांभाळत होती. मग तिची काळजी घेणे, हे आपलेच दायित्व आहे.’’

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)

भाग १०. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/444291.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक