उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक अन्य साधकांसाठी नामजप करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेली प्रक्रिया !
‘६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव गाडगीळ, ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाभाऊ सप्तर्षीआजोबा आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निलीमा सप्तर्षीआजी साधकांसाठी नामजप करतात. त्यांच्या समवेत नामजप करतांना मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. एकदा नामजप पूर्ण झाल्यावर सप्तर्षीआजी आणि गाडगीळआजोबा यांनी मला विचारले, ‘‘तुला नामजप करतांना आणि झाल्यावर काय जाणवले ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘माझा नामजप भावपूर्ण होऊन मला पुष्कळ हलकेपणा जाणवत होता.’’
२. साधिकेचे सूक्ष्मातून शिवाशी झालेले संभाषण
२ अ. ‘उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक अन्य साधकांसाठी नामजप करतांना मी तेथे उपस्थित असतो’, असे शिवाने सांगणे : ११.९.२०२० या दिवशी मी सौ. सप्तर्षीआजी साधकांसाठी नामजप करतांना तेथे बसून नामजप करत होते. तेव्हा मला हलकेपणा जाणवत होता. मी देवाला विचारले, ‘सूक्ष्मातून काय प्रक्रिया घडते, ज्यामुळे सर्व साधकांना चैतन्य मिळते ?’ त्या वेळी मला शिव दिसला. शिवाने मला सांगितले, ‘जीव शिवाशी एकरूप झाल्यावर जिवाचे अस्तित्व रहात नाही, तर तेथे केवळ ‘मी म्हणजे शिव’ असतो.’ मला शिव कैलास पर्वतावर ध्यानस्थ दिसला आणि ‘सर्व साधक त्याच्या समोर बसून नामजप करत आहेत’, असे दिसले, म्हणजे ‘जे साधक अन्य साधकांसाठी नामजप करतात, तेथे भगवान शिव असतो’, असे मला जाणवले.
२ आ. ‘प.पू. गुरुदेवांनी दिलेले ज्ञान कृतीत आणणे, म्हणजे ‘जीव-शिव’ यांची एकरूपता आहे’, असे शिवाने सांगणे : मी भगवान शिवाला विचारले, ‘जीव आणि शिव यांची एकरूपता कशी असते ? ती कशी साधायची ? मला ती काही वेळ तरी अनुभवायला दे.’ तेव्हा त्याने ‘ही स्थिती तुम्ही सतत अनुभवू शकता’, असे सांगितले. ‘ती कशी अनुभवायची ?’, असे मी शिवाला विचारल्यावर त्याने सांगितले, ‘जेथे सत्यं, शिवं, सुन्दरम् आहे, तेथे मी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कृती आणि विचार करतांना मला अनुभवू शकता. तुम्हाला प.पू. गुरुदेवांनी जे ज्ञान दिले, ते सर्व कृतीत आणणे, म्हणजे ‘जीव-शिव’ यांची एकरूपता आहे, उदा. सत्र भावपूर्ण आणि परिणामकारक करणे, सेवा परिपूर्ण करणे, सेवेतील एकरूपता, म्हणजे शिवाशी एकरूप होणे आहे.
शिवाने आणखीही काही सूत्रे सांगितली; पण मला ती शब्दांत सांगता येत नाही. मी ते केवळ अनुभवू शकले.’
– कु. वर्षा जबडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |