भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
भृगु महर्षींच्या आज्ञेने ८.१०.२०१९ या विजयादशमीच्या शुभदिनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर केलेल्या अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात ८.१०.२०१९ या विजयादशमीच्या शुभदिनी भृगु महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावर केलेल्या अभिमंत्रित सुवर्णाभिषेकाचा सोहळा पार पडला. सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वेदमंत्रांच्या घोषात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मस्तकावर ९ सुवर्ण बिल्वपत्रे अर्पण केली. त्यानंतर त्यांच्यावर कलशातील अभिमंत्रित जलाने अभिषेकरूपी प्रोक्षण करण्यात आले. या सोहळ्याचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. कार्यक्रमापूर्वी जाणवलेले सूत्र : कार्यक्रमापूर्वी वातावरणात शांतता जाणवून संपूर्ण निसर्ग, सृष्टी, देवदेवता आणि ऋषिमुनी हा सोहळा पहाण्यासाठी आतूर झाले आहेत, असे जाणवले.
२. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या प्रीतीमय शांतीच्या आणि निर्गुण चैतन्याच्या लहरींमुळे पृथ्वीवरचे कलियुगमय वातावरण पालटून सत्ययुगाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवणे : परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाल्यावर पृथ्वीवरील कलीचा प्रभाव न्यून होऊन श्रीविष्णूचा प्रभाव वाढू लागला. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या प्रीतीमय शांतीच्या आणि निर्गुण चैतन्याच्या लहरींमुळे पृथ्वीवर सत्ययुगाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवले.
३. सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांवर भावपूर्णरित्या फुले वाहिल्यावर नवविधाभक्ती आणि अष्टसात्त्विकभाव फुलांच्या रूपाने श्रीगुरुचरणी अर्पित होणे : जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांवर भावपूर्णरित्या फुले वाहिली, तेव्हा नवविधाभक्ती आणि अष्टसात्त्विकभाव फुलांच्या रूपाने श्रीगुरुचरणी अर्पित झाले. तेव्हा त्या दोघींमध्ये शिष्यभाव, शरणागतभाव, समर्पितभाव, आर्तभाव आणि कृतज्ञताभाव एकत्रित झाल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी त्या दोघींनी अर्पण केलेली भावपुष्पे आनंदाने स्वीकारली. तेव्हा त्यांच्यामध्ये श्रीविष्णूचे तारकतत्त्व आशीर्वादाच्या रूपाने त्यांच्या आज्ञाचक्रातून वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवले.
४. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पुष्पहार अर्पित केल्यावर सूक्ष्म स्तरावर झालेली प्रक्रिया : त्यानंतर सनातनचे संत सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना पुष्पहार घातला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या देहामध्ये तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झालेले विष्णुतत्त्व फुलांच्या गंधात मिसळून पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत होऊन वातावरणात प्रक्षेपित झाला आणि संपूर्ण वातावरणाची शुद्धी झाली.
५. सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मस्तकावर ९ सुवर्ण बिल्वपत्रे अर्पण करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मस्तकावर ९ सुवर्ण बिल्वपत्रे अर्पण केली. त्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे –
५ अ. ‘९’ या अंकाचे महत्त्व
५ अ १ : ‘९’ हा अंक पूर्णांक आहे. ९ बिल्वपत्रे ही परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे अवतारी कार्य पूर्णत्वाच्या दिशेने चालू असल्याचे द्योतक आहे.
५ अ २ : ‘९’ हा अंक नवग्रहांचे प्रतीक आहे. मनुष्यावर नवग्रहांची कृपा झाली, तर त्याच्याकडून सत्कर्मे घडतात आणि अवकृपा झाली, तर दुष्कर्मे घडतात. ‘आता नवग्रहांचे संचालन शिव आणि विष्णु करत आहेत’, असे जाणवले. आता काळाचे वेध हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी लागले आहेत. त्यामुळे नवग्रहांची कृपा आणि अनुकूलता मनुष्याला लाभत आहे.
५ आ. सुवर्णाचे महत्त्व : सर्व धातूंमध्ये सुवर्ण सर्वांत शुद्ध आणि सात्त्विक धातू आहे. सुवर्णामध्ये उच्च देवतांचे तत्त्व ग्रहण करून ते दीर्घकाळ धारण आणि आवश्यकतेनुसार प्रक्षेपित करण्याची क्षमता सर्वाधिक असते. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना अर्पण केलेल्या सुवर्ण बेलांच्या रूपाने तेजोमय विष्णुतत्त्व आणि शिवतत्त्व यांचे मीलन बिल्वपत्रांमध्ये होऊन हरिहरांचे तत्त्व एकत्रितपणे कार्यरत होण्यास साहाय्य झाले.
५ इ. बिल्वपत्रांचे महत्त्व
५ इ १. बिल्वपत्रांमध्ये शिवतत्त्व कार्यरत असते. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना वाहिलेल्या बिल्वपत्रांमुळे श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्याला शिवाचे आशीर्वाद मिळाल्याचे जाणवले. त्यामुळे श्रीविष्णूचे अवतारी कार्य १०० टक्के सफल होणार असल्याचे जाणवले.
५ इ २. बिल्वपत्रांची तीन पाने ही इच्छा, क्रिया आणि ज्ञान या शक्तींचे प्रतीक, तर बिल्वपत्राचा देठ हा ज्ञानोत्तर कार्याचे प्रतीक आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना अर्पण केलेल्या बिल्वपत्रांतून त्यांच्या ज्ञानोत्तर कार्याची प्रचिती येते.
५ इ ३. बिल्वपत्रांची तीन पाने ही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे द्योतक, तर बिल्वपत्राचा देठ हा कालातीत अवस्थेचे प्रतीक आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना अर्पण केलेल्या बिल्वपत्रांतून ‘त्यांचे कार्य कालातीत आहे’, याची प्रचिती येते.
५ इ ४. बिल्वपत्रांची तीन पाने ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांचे द्योतक आहेत, तर बिल्वपत्राचा देठ हा तुर्यावस्थेचे प्रतीक आहे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना अर्पण केलेल्या बिल्वपत्रांतून त्यांच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था संपुष्टात येऊन आता त्यांची तुर्यावस्था चालू झाल्याची प्रचिती आली. यावरून आता परात्पर गुरु डॉक्टर आठवले अधिकाधिक वेळ निर्गुण समाधी अवस्थेत असतील, असे जाणवले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा देह कर्मबंधनातून मुक्त असलेला आणि परमज्ञानात स्थित असलेला दैवी ज्ञानदेह आहे’, असे जाणवले.
५ ई. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकावर ९ बिल्वपत्रे अर्पण केल्यामुळे त्यांचे सहस्रारचक्र जागृत होऊन त्यातून पुष्कळ प्रमाणात निर्गुण शक्ती आणि निर्गुण चैतन्य वातावरणात प्रक्षेपित झाले. हे दोन्ही सर्वसामान्य साधकांना सहन होत नव्हते.
५ उ. बिल्वपत्रे विविध ठिकाणी ठेवण्याचे महत्त्व : यांतील तीन बिल्वपत्रे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तीन बिल्वपत्रे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि उर्वरित तीन बिल्वपत्रे आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवण्यात येणार आहेत. या बिल्वपत्रांमध्ये परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी संक्रमित केलेली निर्गुण शक्ती आणि निर्गुण चैतन्य येणार्या दीर्घकाळात टिकून रहाणार आहे. त्यामुळे आपत्काळामध्ये साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे विविध संकटांपासून रक्षण होणार आहे.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मस्तकावर अभिमंत्रित जलाने प्रोक्षण करणे : त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मस्तकावर कलशातील अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले. जलाच्या माध्यमातून आपमय तारक विष्णुतत्त्वाच्या लहरी कार्यरत झाल्या आणि त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या सहस्रारचक्रातून प्रक्षेपित होणार्या निर्गुण ऊर्जास्रोताला सूक्ष्मातून स्पर्श केला. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणारी प्रगट शक्ती अप्रगट अवस्थेत गेली आणि तिचे प्रक्षेपण उणावले. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याकडून प्रक्षेपित होणारी शक्ती सर्व साधकांना सहन करता आली.
७. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकाच्या ठिकाणी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन होऊन शिवलिंगावर बिल्वार्चन आणि जलाभिषेक चालू असल्याचे जाणवणे : परात्पर गुरु डॉक्टर आठवले नेहमी विष्णुस्वरूप दिसतात. आजच्या कार्यक्रमात जेव्हा बिल्वपत्र आणि जल परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकावर अर्पित करण्यात आले, तेव्हा त्यांच्यामध्ये शिवतत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकाच्या ठिकाणी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन होऊन शिवलिंगावर बिल्वार्चन आणि जलाभिषेक चालू असल्याचे जाणवले अन् हा सोहळा पृथ्वीवर होत नसून कैलासावर होत असल्याचे काही क्षण जाणवले.
८. परात्पर गुरु डॉक्टर आठवले शेषशायी विष्णूच्या रूपात पहुडलेले दिसले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपातील श्रीदेवी आणि भूदेवी त्यांची सेवा करत आहेत’, असे जाणवणे : बिल्वार्चन आणि जल प्रोक्षणाचे क्षण ही दोन कर्मे सोडून इतर वेळी संपूर्ण वातावरणात विष्णुतत्त्वाचा निळसर रंगाचा प्रकाश पसरलेला दिसला अन् हा कार्यक्रम वैकुंठात होत असल्याचे जाणवले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले शेषशायी विष्णूच्या रूपात पहुडिलेले दिसले आणि ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या रूपातील श्रीदेवी आणि भूदेवी त्यांची सेवा करत आहेत’, असे जाणवले.
९. श्री. दामोदर वझेगुरुजी यांच्या माध्यमातून देवगुरु बृहस्पतीच नाराणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पुढे भावपूर्ण मंत्रपठण करत असल्याचे जाणवणे : या कार्यक्रमामध्ये सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी भावपूर्ण मंत्रपठण केले. तेव्हा त्यांच्या माध्यमातून देवगुरु बृहस्पतीच नाराणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पुढे भावपूर्ण मंत्रपठण करत असल्याचे जाणवले. तेव्हा त्यांच्या वाणीतून भाव, चैतन्य आणि आनंद यांचे एकत्रित प्रक्षेपण झाले.
१०. श्री. विनायक शानभाग यांच्या ठिकाणी महर्षि नारद यांचे दर्शन होऊन ते श्रीविष्णूचे वर्णन आणि स्तुती करत असल्याचे जाणवणे : या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायक शानभाग यांनी त्यांच्या रसाळ आणि ओघवत्या वाणीमध्ये केले. त्यांच्या ठिकाणी मला महर्षि नारद यांचे दर्शन होऊन ते श्रीविष्णूचे वर्णन आणि स्तुती करत असल्याचे जाणवले. नारदमुनींचे बोलणे संपल्यावर ते जागृतावस्थेतील समाधी अनुभवत असल्याचे जाणवले. जेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर बिल्वार्चन चालू होते, तेव्हा नारदमुनींनी आनंदाने सूक्ष्मातून वीणावादन केले. वीणेच्या रूपाने सरस्वतीदेवीचे आगमन कार्यक्रमस्थळी होऊन आनंदात वृद्धी झाली.
११. कार्यक्रमाच्या वेळी श्रीविष्णूचा नामजप चालू असणे : हा कार्यक्रम पहातांना माझे मन आणि चित्त शांत झाले होते अन् माझा ‘श्रीविष्णवे नम : ।’, हा नामजप आपोआप चालू झाला.
आज हरिहरांचे एकत्रित दर्शन झाले !
‘दसर्याला दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाले ।
आज आनंदाला उधाण आले ॥ १ ॥
परात्पर गुरुदेवांवर बिल्वार्चन झाले ।
आज हरिहरांचे एकत्रित दर्शन झाले ॥ २ ॥
युगायुगांची प्रतिक्षा संपत आली ।
हिंदु राष्ट्र स्थापण्याची वेळ समीप आली ॥ ३ ॥’
कृतज्ञता : ‘हे भगवंता, तुझ्या कृपेने आज हरिहरांचा‘ न भूतो न भविष्यति’ असा हा दिव्य सोहळा पहाण्याची संधी आणि सनातनच्या इतिहासातील सुवर्ण क्षण अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१९, रात्री ११.५०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |