अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या मालमत्तांचे खरे मूल्य मुख्यमंत्र्यांनी घोषित करावे – डॉ. किरीट सोमय्या
मुंबई – मुख्यमंत्र्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून घेतलेल्या मालमत्तांचे खरे मूल्य घोषित करावे, अशी मागणी भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले की, सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० भूमी किंवा मिळकती २९ एप्रिल २०१४ मध्ये घेतल्या आहेत. या भूमींचे करार ग्रामपंचायती मध्ये केलेले अर्ज, नोंदणी, त्यावरील १९ बंगले या संबंधीच्या घरपट्ट्या, ठाकरे आणि वायकर परिवाराद्वारे करण्यात आलेल्या कराराच्या प्रती आमच्याकडे उपलब्ध आहेत.
सौ. रश्मी उद्धव ठाकरे, सौ. मनिषा रविंद्र वायकर आणि अन्वय मधुकर नाईक यांच्य मध्ये वरील मिळकती विषयी करार झाला आहे. प्रत्यक्षात सरकारी बाजारभावाप्रमाणे त्या वेळी ही मिळकत ४ कोटी १४ लाख रुपये असणे अपेक्षित होते. प्रत्यक्ष खरेदी किंमत २ कोटी १० लाख रुपयांना विकत घेण्याच्या ठरवल्या आहेत.
ग्रामपंचायतीच्या नोंदीप्रमाणे २०२०-२१ मध्ये या भूमीवर बंगल्याचे रेडीरेकनर किंवा बाजारमूल्य ५ कोटी २९ लाख रुपये आहे. असे असतांनाही ठाकरे आणि वायकर परिवारांनी अन्वय नाईक यांना केवळ २ कोटी १० लाख रुपये दिल्याचे सोमय्या यांनी निदर्शनास आणले आहे.