अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चौघांना अटक 

विद्यापिठाच्या कुलगुरूंचा पासवर्ड हॅक 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठातील हा प्रकार शिक्षणक्षेत्राला लज्जास्पद ! 

सोलापूर – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठातील कुलगुरूंच्या संगणकाचा ‘मास्टर पासवर्ड’ हॅक करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याप्रकरणी तत्कालीन परीक्षा नियंत्रकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तत्कालीन परीक्षा मंडळ आणि मूल्यमापन मंडळ संचालक श्रीकांत कोकरे, यंत्रणा विश्‍लेषक प्रशांत चोरमले, सुविधा समन्वयक हसन शेख आणि प्रोग्रामर प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाअंतर्गत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गैरव्यवहार करून गुण वाढवल्याप्रकरणी विद्यापिठाने फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण सायबर पोलिसांकडे देण्यात आले होते. न्यायालयाने या चारही संशयित आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.