भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भाव असणार्या डॉ. शिवांगी साहा ‘एम्.सीएच्.’च्या परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण
कोलकाता – डॉ. शिवांगी साहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स्), नवी देहली येथे ‘प्लास्टिक सर्जन’ आहेत. त्या ‘एम्.सीएच्.’च्या परीक्षेत सर्व ‘सर्जिकल स्पेशालिटीज’मध्ये (शल्यचिकित्सा विशेषमध्ये) सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. याचे श्रेय त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दिले. डॉ. शिवांगी यांचे वडील श्री. सियाराम साहा, आई सौ. तनुश्री साहा आणि लहान बहीण डॉ. श्रिया साहा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.
या यशाविषयी त्या डॉ. शिवांगी म्हणाल्या, ‘‘आजपर्यंतच्या प्रत्येक परीक्षेत मला ‘माझे चांगले योगदान द्यायचे आहे आणि यासाठी मी उत्तरदायी आहे’, असे वाटत असे. त्यामुळे अभ्यास करतांना, तसेच परीक्षेच्या वेळी मला ताण यायचा. या परीक्षेच्या पूर्वीही मला अभ्यासाचा तणाव जाणवायचा, तेव्हा श्रीकृष्णच मला साहाय्य करणार आहे, असे मला जाणवत होते. परीक्षेच्या दिवशी अभ्यास अपूर्ण असेल, तेव्हा मनात कोणत्याही प्रकारचे तणावाचे विचार येऊ नयेत; म्हणून मी संपूर्ण शरणागत भावाने श्रीकृष्णाचा नामजप करायचे. मी एका लहान मुलासारखी भगवंताला आळवत असे. असे करतांना ‘मी एक लहान मुलगी आहे आणि भगवंतच माझा हात पकडून माझ्याकडून परीक्षेत उत्तरे लिहून घेणार आहे’, असा भाव मी ठेवत असे. परीक्षेच्या खोलीत जातांना मला असे वाटत होते की, ईश्वर माझ्या समवेत असून तो माझे बोट पकडून मला परीक्षेला घेऊन जात आहे आणि परीक्षेच्या वेळी तो माझ्या समवेतच बसून बोलत आहे. या प्रयत्नांमुळे माझी परीक्षा अतिशय चांगली झाली.
जेव्हा परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा कळले की, मला सर्वाधिक गुण मिळाले आहेत. खरे तर व्यावसायिक दायित्वामुळे मी अतिशय व्यस्त असते. त्यामुळे मला साधना करण्यासाठी वेळ मिळत नाही; परंतु जेव्हा मी प्रतिदिन कोलकाता येथील माझ्या आई-वडिलांना दूरभाष करते, तेव्हा मला त्यांच्याकडून सत्संग मिळतोे. त्यात प्रत्येक कठीण परिस्थितीत सकारात्मक रहाणे, शरणागत आणि कृतज्ञताभावात रहाणे आदी मला शिकायला मिळते. माझ्या जीवनातील प्रत्येक यशासाठी मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’’