गोवा बाल न्यायालयात शिक्षा झालेला आरोपी उच्च न्यायालयात निर्दोष
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचे प्रकरण
चक्रावणारा न्याय !
पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – वर्ष २०११ मधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने माजी शिक्षक कन्हैया नाईक यांची निर्दोष सुटका केली आहे.
कन्हैया नाईक यांनी शिकवण्या (ट्यूशन) घेतांना एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी कन्हैया नाईक यांना कह्यात घेऊन पुढे त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कन्हैया नाईक यांना जामीन मिळाल्यानंतर पीडित युवतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी गोवा बाल न्यायालयाने ऑगस्ट २०१७ मध्ये निवाडा देतांना कन्हैया नाईक यांना ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.