‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापून त्यांचा अवमान !
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचा वेगवेगळ्या माध्यमातून अवमान करणार्यांवर त्वरित कठोर कारवाई करणारा कायदा केंद्र सरकारने देशात लागू करावा, अशी धर्मप्रेमींची मागणी आहे !
बेळगाव – ‘कल्याण’ नावाच्या मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापण्यात आले आहे. बेळगाव परिसरात काही नागरिकांना ‘व्हॉट्सअॅप’ या सामाजिक माध्यमावर या चिठ्ठीचे छायाचित्र आढळून आले आहे. या चिठ्ठीवर या मटक्याचा पत्ता दिला असून नरोडा रोड, एन्.सी. हिल्स असे लिहिले आहे. ‘सत्ता मटका हेड ऑफीस’ असे लिहिलेल्या या चिठ्ठीवर एजंटांची नावे दिली असून त्यांचे दूरभाष क्रमांकही दिले आहेत. मटक्याच्या चिठ्ठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापल्याचे आढळून आल्याने शिवप्रेमी संतप्त झाले असून ‘प्रशासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करत या चिठ्ठीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र त्वरित हटवावे’, अशी मागणी केली आहे.