चाफळ (जिल्हा सातारा) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन 

सातारा – तीर्थक्षेत्र चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला. १८ जानेवारीच्या पहाटे ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

महसूल विभागाने मोठी कारवाई केली असली, तरी कुणाच्या पाठबळाने गौण खनिज उत्खनन चालू होते, याचे अन्वेषण पोलिसांनी करणे आवश्यक आहे. तसेच ‘महसूल विभाग आणि पोलीस यांनी संबंधितांवर कडक कारवाई केली, तरच असे प्रकार थांबतील’, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.