सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ जानेवारीला आंदोलन करण्याची चेतावणी
भ्रष्टाचार्यांवर प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असून त्याचा प्रारंभ २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येथील उपविभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून करण्यात येणार आहे, अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.
याविषयी सावंत म्हणाले, ‘‘पूर्वी सर्वसाधारण नागरिकांचा संपर्क नगररचना विभागाशी येत नव्हता. शासनाच्या पालटत्या धोरणांमुळे आता सर्वसामान्य जनतेचा संपर्क या विभागाशी येऊ लागला. आता या खात्यातील सर्वांनाच चांगले दिवस आले आहेत. काही प्रामाणिक कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी वेतनाच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात माया गोळा करत आहेत. नगररचनाकारच भ्रष्टाचारी असल्याने त्यांनी संमत केलेल्या प्रस्तावांची तपासणी होत नाही. तपासणी झालीच, तर ‘मॅनेज’ केली जात असल्याने या खात्यातील भ्रष्टाचार शोधणे कठीण आहे. शासनाच्या धोरणांमुळे नगररचना कार्यालयात खेडेगावातील जनता भरडली जात आहे. खेडेगावात घर बांधण्यासाठी अनुमती देण्यासाठीही त्याचा दर ठरलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची फरपट होत आहे. माहितीच्या अधिकारात माहिती दिली जात नाही; कारण नगररचनाकारच प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. माहिती मागितली, तर ते थातूरमातूर उत्तरे देऊन अर्ज फेटाळून लावतात. या भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा आणि भ्रष्ट अधिकार्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी आंदोलन करणार आहे.’’