बंदी असूनही कोलवा परिसरात ‘धिर्यो’(बैलांची झुंज)चे सर्रास आयोजन
शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने अन् सहस्रो लोक उपस्थित असूनही पोलिसांना याची माहिती नव्हती असे कसे म्हणता येईल ? त्यामुळे पोलिसांच्या सहकार्यानेच असे अनधिकृत धंदे चालतात, असेच म्हणावे लागेल !
मडगाव, १९ जानेवारी (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘धिर्यो’चे (बैलांची झुंज) आयोजन करण्यास बंदी आहे, तरीही कोलवा परिसरात सर्रासपणे ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार १६ आणि १७ जानेवारी या दिवशी कोलवा परिसरात ‘धिर्यो’चे आयोजन करण्यात आले. वाड्डी, बाणावली येथे अशाच प्रकारे धिर्योचे आयोजन करण्यात आले. ‘धिर्यो’ चालू असलेल्या ठिकाणी शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी (पार्क) केलेली होती, तर ‘धिर्यो’ पहायला सहस्रो लोक उपस्थित होते; मात्र या ठिकाणी एकही पोलीस उपस्थित नव्हता. कोलवा पोलीस घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवल्याचे सांगत होते; मात्र प्रत्यक्षात ‘धिर्यो’ होत असलेल्या ठिकाणी एकही पोलीस नव्हता. (यावरून जनतेने लक्षात घ्यायला हरकत नाही की, पोलिसांना वरिष्ठांपर्यंत धिर्योचे आयोजन करणार्यांकडून आवश्यक तेवढा मलिदा मिळाला असणार ! कुणाला अटक करायची आणि कुणाला नाही, हे पैशांच्या मोबदल्यावरून ठरते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये ! – संपादक)