येरला (जिल्हा नागपूर) गावातील २ तरुणांना मारहाण केल्याने संतप्त महिलांनी अवैध मद्यविक्रेत्यांची ६ वाहने जाळली !
|
नागपूर – अवैध मद्यविक्रेत्यांनी जिल्ह्यातील येरला गावातील २ तरुणांना मारहाण केल्यामुळे गावातील महिलांनी अवैध मद्यविक्रेत्यांची ६ दुचाकी वाहने जाळली. त्यानंतर महिलांनी मद्याच्या अड्ड्यातून अवैध मद्याचा साठा जप्त केला. ही घटना १७ जानेवारीला रात्री घडली. घटनेनंतर दुसर्या दिवशी दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते. कळमेश्वर पोलिसांनी गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला. २ तरुणांना मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे; मात्र सर्व आरोपी सध्या पसार आहेत.
१. येरला गावात गेल्या अनेक मासांपासून अवैध मद्यविक्री चालू आहे. (जी गोष्ट महिला आणि गावकरी यांच्या लक्षात येते, ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या पोलिसांच्या निदर्शनास का आली नाही ? पोलीस झोपा काढत होते का ? – संपादक) ही विक्री थांबवावी, अशी मागणी महिलांनी अवैध विक्रेत्यांकडे केली होती; मात्र त्यांनी या महिलांची विनंती न ऐकता धंदा चालूच ठेवला होता.
२. त्यामुळे महिलांनी त्यांच्या अवैध धंद्याच्या परिसरात गस्त चालू केली होती. अवैध मद्यविक्रेते गावकर्यांवर चिडून होते. मद्यविक्रेत्यांनी किरकोळ कारणावरून गावातील २ तरुणांना मारहाण केली. हातात तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन गावातील रस्त्यांवर धुमाकूळ घातला.
३. त्यानंतर रागावलेल्या महिलांनी एकत्र येत अवैध मद्याच्या अड्ड्यावर मोर्चा काढून मद्याचे अड्डे उद्ध्वस्त केले. महिलांनी मद्यविक्रेत्यांना मारहाण केल्याने ते पळून गेले. त्यानंतर महिलांनी त्यांच्या ६ दुचाकी जाळून टाकल्या. (खरेतर पोलिसांनी अवैध मद्याच्या विरोधात विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे होते. येथे पोलिसांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांना पुढाकार घ्यावा लागला. धृतराष्ट्र-गांधारी वृत्ती बाळगणारे पोलीस जनतेचे कधीतरी रक्षण करतील का ? – संपादक)