कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा शिवसेनेकडून निषेध
कोल्हापूर, १९ जानेवारी (वार्ता.) – कर्नाटकातील मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून शिवसेनेने येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे मिरजकर तिकटी येथे दहन केले. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान सहन करणार नाही आणि यापुढे अपशब्द वापल्यास कर्नाटकातील एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही’, अशी चेतावणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांनी १९ जानेवारीला दिली. या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, सर्वश्री मंजित माने, सुजित चव्हाण, दत्ता टिपुगडे, शशी बिडकर यांसह अन्य उपस्थित होते. बेळगाव महापालिकेच्या समोर अनधिकृतरित्या लाल-पिवळा ध्वज लावला आहे. असे करून मराठी भाषिकांचा डिवचण्याचा, तसेच वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा ध्वज प्रशासनाने त्वरित न काढल्यास २१ जानेवारी या दिवशी होणार्या मोर्च्यात कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिवसैनिक भगवा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी चेतावणी श्री. विजय देवणे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ‘कर्नाटकची इंचभरही भूमी देणार नाही. उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य वातावरण बिघडवू शकते. सच्चे भारतीय म्हणून उद्धव ठाकरे हे देशाच्या संघराज्याय तत्त्वांचा आदर करतील’, असे वक्तव्य केले होते.