हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ची स्थापना

सिंधुदुर्ग – हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पुरस्कृत ‘वन स्टॉप सेंटर’ ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविषयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे आणि दिलासा देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. कोणतीही हिंसाग्रस्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.

कोणत्याही वयोगटातील महिला कोणत्याही प्रकारच्या साहाय्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’शी संपर्क साधू शकते.

केंद्रशासनाने हिंसाचारग्रस्त महिला आणि बालिका यांना सुलभ अन् सुखकर आयुष्यासाठी मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने सेंटरची स्थापना केली आहे. या योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत १८२ सेंटर्स उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १ लाख ३० सहस्रांहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे. नव्याने संमती देण्यात आलेल्या नियमांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ‘वन स्टॉप सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. या सेंटरच्या व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय परिसर येथील टाईप ४, इमारत क्रमांक ६, खोली क्रमांक १ येथे हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२३६२-२२९०३९ किंवा ०२३६२-२२८८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांनी केले आहे.