चिपळूण (रत्नागिरी) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. ज्ञानदेव पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
‘मी श्री. ज्ञानदेव पाटील यांना पूर्वीपासून ओळखतो. ते ‘घरडा केमिकल’ आस्थापनाच्या संकुलात रहात होते. तेव्हा माझे प्रसाराच्या निमित्ताने त्यांच्याकडे जाणे व्हायचे.
१. पूर्वीची साधना
‘पाटीलकाका आधी अन्य संप्रदायानुसार साधना करत होते. ते पूर्वी पू. कलावतीआई आणि नंतर वारकरी या संप्रदायानुसार साधना करत होते. तेथे त्यांचे मन रमले नाही. नंतर ते साईबाबांची भक्ती करू लागले. त्यांना त्यातही समाधान मिळाले नाही.
२. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ
वर्ष १९९६ मध्ये पाटीलकाकांची प.पू. गुरुमाऊलींशी भेट झाली. तेव्हा त्यांना पुष्कळ समाधान वाटले आणि आनंद मिळाला. प.पू. गुरुमाऊलींचा एकेक शब्द ऐकून काकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. त्या वेळी ‘मला जे हवे आहे, ते याच ठिकाणी मिळणार आहे’, याची काकांना निश्चिती झाली आणि त्यांनी साधनेला आरंभ केला. खरेतर ‘गुरुमाऊलींनीच साधना करवून घेतली, घेत आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते साधना करवून घेणार आहेत’, अशी काकांची श्रद्धा आहे.
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग मिळाल्यावर जीवनात आमूलाग्र पालट होणे : एकदा मी पाटीलकाकांशी बोलत असतांना त्यांनी सांगितले, ‘‘वर्ष १९९६ आणि १९९७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर ‘घरडा कॉलनी’त आले होते. त्या वेळी ‘कॉलनीती’ल एकाच बिल्डींगमध्ये ६ साधक रहात होते. त्या कालावधीत प.पू. गुरुदेव २ वेळा आमच्या ‘कॉलनी’त आले होते. प.पू. गुरुदेव माझ्या जीवनात आले. मला त्यांचा सत्संग मिळाला आणि माझ्या जीवनात आमूलाग्र पालट झाला.’’
२ आ. साधकांचा सत्संग मिळणे : काकांनी प.पू. भक्तराज महाराज यांची कुडाळ येथे झालेली ‘गुरुपौर्णिमा’ अनुभवली आहे. तो त्यांना मिळालेला मोठा सत्संगच होता. काही दिवसांनी श्री. केसरकरकाका आणि श्री. तनपुरेकाका हे रत्नागिरी येथे प्रसारासाठी यायचे. तेव्हा ते पाटीलकाकांच्या घरी मुक्कामाला असायचे.
३. गुणवैशिष्ट्ये
३ अ. व्यवस्थितपणा : माझे प्रसाराच्या निमित्ताने पुष्कळ वेळा चिपळूण येथे जाणे होते. तेव्हा माझ्या निवासाची व्यवस्था पाटीलकाकांच्या घरी असते. त्यांच्या घरातील सर्व सामान व्यवस्थित आणि नीटनेटके ठेवलेले असते. त्यांच्या घरात कुठेच पसारा दिसत नाही.
३ आ. प्रेमभाव
१. काका घरी आलेल्या व्यक्तींचा पाहुणचार उत्तम रितीने करतात. ते त्यात कशाचीच न्यूनता पडू देत नाहीत. काका घरात आलेल्या व्यक्तींना काही हवे-नको विचारून घेऊन तसे करण्याचा प्रयत्न करतात. मला त्यांच्या घरी कुठेच परकेपणा जाणवत नाही. पाटीलकाकूही काकांना साहाय्य करतात.
२. काका अनेक वेळा मला रेल्वे स्थानकात आणायला आणि पोचवायला येतात. ते माझी प्रवासात खाण्या-पिण्याची उत्तम व्यवस्था करतात.
३ इ. ते ‘घरडा केमिकल’ आस्थापनात नोकरीला होते. तेथे ते ‘युनियन लीडर’ होते. त्यामुळे त्यांच्यात पूर्वीपासूनच नेतृत्वगुण आहे.
३ ई. सेवाभाव
३ ई १. एकदा प.पू. गुरुदेवांचे अलोरे, ता. चिपळूण येथे साधकांसाठी मार्गदर्शन होते. पाटीलकाकांना ते सभागृह स्वच्छ करण्याची सेवा मिळाली. त्यांनी ती सेवा मनापासून केली आणि सेवेचा आनंद घेतला.
३ ई २. हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि वेगवेगळ्या कार्यशाळा यांच्याशी संबंधित सेवेत उत्स्फूर्त सहभाग असणे : पाटीलकाका नोकरी करत असतांना कामावरून सुटल्यावर सेवेला वेळ देत असत. आता ते नोकरीतून निवृत्त झाले आहेत. आता ते पूर्णवेळ सेवेसाठी देतात. ते चिपळूण येथील साधकांच्या सेवेचे नियोजन पहातात. जिल्ह्यात होणार्या अन्य कार्यक्रमांमध्ये (हिंदु धर्मजागृती सभा आणि वेगवेगळ्या कार्यशाळा यांमध्ये) त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी ते व्यासपिठाशी संबंधित सेवांपासून सर्व सेवा दायित्व घेऊन करतात. ‘पाटीलकाका आहेत, म्हणजे सर्व व्यवस्थित होणार’, अशी सर्वांना निश्चिती असते. ते अन्य उपक्रमांच्या वेळीही दायित्व घेऊन सेवा करतात.
३ ई ३. साधकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे : काकांची सर्व साधकांशी जवळीक आहे. चिपळूण येथील साधक आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या अडचणी काकांना हक्काने सांगतात आणि काकाही त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. ‘प्रत्येक साधकाची अडचण ही स्वतःचीच अडचण आहे’, असे काकांना वाटते आणि ते ती अडचण सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. ‘गुरुदेवांच्या कृपेनेच हे सर्व होत असते’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
३ उ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
३ उ १. साधकांच्या अडचणींची मनातून जाणीव होणे : साधकांना कधी अडचण आल्यास पाटीलकाकांना ईश्वरकृपेने त्याची आधीच जाणीव होते आणि ‘त्या साधकांना दूरभाष केला पाहिजे’, असे काकांना मनोमन वाटते. काकांनी संबंधित साधकांना दूरभाष केल्यावर ‘त्या साधकांना काहीतरी अडचण असते’, असे काकांच्या लक्षात येते.
३ उ २. साधकाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे आधीच जाणवत असल्याने त्या साधकाचे गुण हेरून त्याच्याविषयी लिहून देणे : काकांची निरीक्षणक्षमता उत्तम आहे, तसेच त्यांना साधकांची पारखही चांगली आहे. आजपर्यंत काकांनी ज्या साधकांची गुणवैशिष्ट्ये लिहून दिली, त्या साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली आहे. ते म्हणतात, ‘‘गुरुमाऊलींच्या कृपेनेच साधकांची गुणवैशिष्ट्ये माझ्या लक्षात येतात.’’ ते नेहमी शिकण्याच्या भूमिकेत असतात.
३ ऊ. कृतज्ञताभाव : काकांना त्या वेळच्या उत्तरदायी साधिका कु. दीपाली मतकर यांच्याकडून सेवेसंदर्भातील अनेक गोष्टी शिकायल्या मिळाल्या. काका नेहमी गुरुमाऊली आणि कु. दीपाली मतकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
४. १७.११.२०१५ या दिवशी काकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
५. अनुभूती
एकदा पाटीलकाकांनी त्यांना आलेली अनुभूती मला सांगितली. त्यांनी सांगितले,
५ अ. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी सेवा करतांना प.पू. भक्तराज महाराज यांनी ग्रंथकक्षावर येऊन ‘नामसंकीर्तनयोग’ हा ग्रंथ विकत घेणे आणि ‘यामध्ये सर्व आहे. याचा प्रसार सर्व जगभर करायचा आहे’, असे सांगून निघून जाणे : ‘‘वर्ष १९९६ मध्ये चिपळूण येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावले होते. त्या वेळी ग्रंथ अल्प संख्येत होते. ‘गुरुकृपायोग’, ‘नामसंकीर्तनयोग’, ‘शिष्य’, ‘हठयोग’ आणि ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ असे ग्रंथ ठेवून त्यांनी कक्ष लावला होता. २ दिवस कक्ष लावल्यानंतर दोन्ही दिवसांची ग्रंथविक्री सव्वाच्या पटीत (५२५ रुपये आणि ७२५ रुपये) झाली. तिसर्या दिवशी कक्ष बंद करून विक्रीची रक्कम मोजल्यावर ती सव्वाच्या पटीत नसल्याने मला वाईट वाटले. ग्रंथकक्षावर सेवा करणारे साधक याविषयी बोलत असतांना एक व्यक्ती ग्रंथकक्षावर आली आणि त्यांनी विचारले, ‘‘ज्या ग्रंथात सर्वच आहे, असा एखादा ग्रंथ तुमच्याकडे आहे का?’’ आम्ही त्यांना ग्रंथाची वैशिष्ट्ये सांगत असतांना त्यांनी ग्रंथांच्या पिशवीत हात घातला आणि एक ग्रंथ न पाहता बाहेर काढला. ते तो ग्रंथ आम्हाला दाखवून म्हणाले, ‘‘यामध्ये सर्वच आहे. याचा प्रसार जगभर करायचा आहे.’’ तो ‘नामसंकीर्तनयोग’ हा ग्रंथ होता. त्यांनी ग्रंथाचे मूल्य दिले आणि ते देवाचे दर्शन न घेताच निघून गेले. ते गेल्यानंतर आम्ही ग्रंथविक्रीचे पैसे मोजल्यावर ते सव्वाच्या पटीत (६२५ रु.) मिळालेले पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. त्या व्यक्तीने पांढरा सदरा, वर जाकीट, धोतर आणि डोक्यावर टोपी, असा पोशाख केला होते. नंतर आमच्या लक्षात आले, ‘ती व्यक्ती, म्हणजे साक्षात् प.पू. भक्तराज महाराज होते.’ आम्हा तिघांना याची एकाच वेळी जाणीव झाली आणि पुष्कळ आनंद झाला. आम्ही दोन्ही मार्गाने जाऊन आलो; परंतु आम्हाला ती व्यक्ती कुठेच दिसली नाही. साक्षात् प.पू. भक्तराज महाराज यांनी आम्हाला दर्शन दिले. आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’’
‘प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून काकांविषयी लिहून घेतले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, रत्नागिरी (४.११.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |