गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !
सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
१९ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ७)
भाग ६ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/442861.html
१२. बाळंतपणानंतर अनुभवलेले गुरुमाऊलीचे वात्सल्य !
१२ इ. बाळ १५ दिवसांचे असतांना दम्याचा त्रास होऊन त्याचे ओठ काळे निळे पडणे, बाळाला औषधोपचारांनी गुण न येणे; मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या नामजपाचा बाळाला लाभ होणे : बाळ १५ दिवसांचे असतांनाच त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आधुनिक वैद्यांनी केलेल्या औषधोपचारांनी त्याचा त्रास न्यून होत नव्हता. हे परात्पर गुरु डॉक्टरांना कळवल्यावर त्यांनी आम्हाला गणपतीचा नामजप करायला सांगितला आणि ‘पुढेही बाळ स्वतः जोपर्यंत नामजप करू शकत नाही, तोपर्यंत प्रतिदिन गणपतीची पूजा, नामजप, संकष्टी आणि विनायकी चतुर्थीचे उपवास करा’, असे सांगितले. त्या उपायांनी बाळाला बरे वाटले. हे सर्व फारच अद्भुत होते. त्यामुळे उपचार करणार्या आधुनिक वैद्यांनाही त्याचे नवल वाटले आणि ते म्हणाले, ‘‘या उपायांनी बाळाला बरे कसे वाटले ?’’
परात्पर गुरु डॉक्टर यातून जणू अध्यात्मशास्त्राचा एकेक पैलू आम्हाला उलगडून दाखवत आणि त्यातून शिकवत होते.
१२ ई. बाळ लहान असतांना साधिकेची साधना होण्यासाठी केलेले साहाय्य
१२ ई १. गुरुपौर्णिमेच्या वेळी चि. केदार ३ मासांचा असल्यामुळे इतर सेवा करता न येणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी नारायणगाव येथील संत प.पू. काणे महाराज यांच्या निवासाची सोय धामसे येथे करणे आणि प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी चि. केदारला प.पू. बाबांच्या चरणांवर घालण्याची संधी देणे : वर्ष १९९४ मधील गुरुपौर्णिमा गोवा येथील रामनाथी देवस्थानात करण्याचे ठरवले होते. केदार लहान असल्याने मी काही करू शकत नव्हते. असे असले, तरी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रत्येक साधकाची स्थिती ठाऊक होती आणि त्यांना प्रत्येक साधकाचे स्मरणही होते. त्यामुळे त्यांनी गुरुपौर्णिमेसाठी आलेले नारायणगाव येथील संत प.पू. काणे महाराज यांना धामसे येथे आमच्या घरी ३ दिवस रहायला पाठवले होते. त्याचबरोबर परात्पर गुरु डॉक्टरांनी कार्यक्रमात संतांना द्यायच्या भेटवस्तूंच्या संदर्भातील सेवा मला दिली. मी ती सेवा घरी बसून करू शकत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी मला प.पू. काणे महाराज यांच्या समवेत चि. केदारला घेऊनच कार्यस्थळी येण्यास सांगितले आणि मला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन घ्यायला सांगून केदारला त्यांच्या चरणांवर घालण्याची संधी दिली.
१२ ई २. केदारला सांभाळण्यासाठी मुली मिळत नसतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी उरण-पेण येथील एक मुलगी पाठवणे आणि तिला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिला एक जपमाळ अन् नामजप लिहून देणे : केदार ४-५ मासांचा झाल्यावर मी परत अधिकोषात रुजू होण्याची सिद्धता करू लागले होते. आम्ही केदार २ मासांचा झाल्यापासूनच त्याला सांभाळायला एखादी मुलगी शोधत होतो; परंतु धामसे येथे रहाण्यास कुणीच सिद्ध नव्हते. आम्ही न्यूनतम १५ मुली तरी पाहिल्या. त्यांपैकी काहीजणी २ दिवस येऊन राहून नंतर निघून गेल्या. शेवटी मी नोकरीचे त्यागपत्र द्यायचे ठरवले. ही गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांना कळली. तेव्हा त्यांनी ‘‘एवढ्यात नोकरी सोडू नका’’, असे सांगून उरण-पेण येथील एक मुलगी केदारला सांभाळण्यासाठी पाठवली. त्या मुलीला तीव्र आध्यात्मिक त्रास होता; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला एक जपमाळ दिली आणि समवेत तिने करावयाच्या नामजपाची चिठ्ठी लिहून दिली.
‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले साधकांच्या कल्याणाचे दायित्व कुठल्या स्तरापर्यंत घेत होते’, हे या प्रसंगावरून आमच्या लक्षात आले.
१२ ई ३ . प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथे होणार्या अमृतमहोत्सवाच्या सोहळ्याच्या वेळी केदार केवळ ८ मासांचा असल्यामुळे जाण्यासाठी मनाचा संघर्ष होणे; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच सर्व सोय होऊन कार्यक्रमाचा लाभ घेता येणे : ९ फेब्रुवारी १९९५ मध्ये इंदूर येथे प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव साजरा होणार होता. मला तेथे सेवेला जाण्याची पुष्कळ इच्छा होती; मात्र तिथे राहून सेवा करण्याचा कालावधी १ मासाचा ठरवला होता आणि तेव्हा केदार केवळ ८ मासांचा होता. त्यामुळे मला तिथे सेवेला जाण्यासाठी घरच्यांचाही पुष्कळ विरोध होता. अनेक त्रासानंतर झालेले बाळ; म्हणून सर्व जण त्याची पुष्कळ काळजी घेत होते. त्यामुळे माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता. तेव्हा ‘‘पुढील ५०० वर्षांत असा आध्यात्मिक कार्यक्रम होणार नाही. साधकांनी याचा लाभ अवश्य घ्यावा’’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. मग मी एका वयस्कर बाईला केदार आणि अपर्णा यांना सांभाळण्यासाठी विनवले आणि त्या सिद्धही झाल्या. परात्पर गुरु डॉक्टरांनी या सर्व परिस्थितीत मला खंबीरपणे प्रोत्साहन देऊन आधार दिला; म्हणून मी या ‘न भूतो, न भविष्यति’ अशा कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकले.
परात्पर गुरु डॉक्टर आम्हा साधकांना मानसिक स्तरावर न हाताळता त्यांना आध्यात्मिक स्तरावर जे आवश्यक आहे, तेच करण्यास सांगत होते.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443572.html