७० पैकी ४५ ग्रामपंचायती भाजपकडे, तर शिवसेनेची २१ ग्रामपंचायतींवर सत्ता
|
कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली होती. त्याचा निकाल १८ जानेवारीला घोषित झाला. या वेळी ७० पैकी ४५ ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेला २१ ग्रामपंचायतींत यश मिळाले. राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळवता आलेले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा धुव्वा उडाला. देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना यश मिळाल्याने महाविकास आघाडीला एकमेव ग्रामपंचायत मिळवता आली, तर ३ ठिकाणी ग्रामविकास समितीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली आणि कुडाळ तालुक्यातील गोवेरी या २ ग्रामपंचायतींची त्रिशंकू अवस्था असून अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या राहिल्या आहेत.
या निवडणुकीतील काही महत्त्वाची सूत्रे…
१. राज्यात सत्ता असूनही ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळवता आले नाही.
२. भाजपला मोठे यश मिळाले असले, तरी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या विजयात खासदार राणे, आमदार नितेश राणे यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे.
३. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.
४. कणकवली तालुक्यातील तोंडवळी, बावशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळवण्यात भाजपला तब्बल १५ वर्षांनंतर यश आले आहे. येथे ७ पैकी ६ जागांवर भाजप, तर एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
|
‘शिवसेना नेत्यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले, ते मतदारांना आवडले नाहीत. आगामी जिल्हा बँक निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक येथेही भाजपचाच झेंडा फडकेल’, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी या विजयाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केला. |