कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण देवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ देणार नाही ! आमदार मायकल लोबो
म्हापसा, १८ जानेवारी (वार्ता.) – ‘कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण देवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ देणार नाही. ही जागा देवीची आहे. माझाही या प्रकल्पाला विरोध आहे. हा प्रकल्प या जागेतून रहित करून दुसर्या जागेत नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया मी चालू करीन’, असे आश्वासन कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो यांनी १८ जानेवारीला येथे झालेल्या सभेच्या वेळी दिले. कळंगुट येथील श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण देवीच्या जागेत मलनिस्सारण प्रकल्प होऊ न देण्यासंदर्भात १७ जानेवारीला सकाळी मंदिराच्या जागेत श्री शांतादुर्गा नास्नोडकरीण समितीचे सदस्य, श्री शांतादुर्गा देवस्थान, नानोडा या मंदिराच्या समितीचे सदस्य, कळंगुट कॉन्स्टिट्युअन्सी फोरमचे सदस्य आणि इतर समविचारी संघटना अन् ग्रामस्थ यांची सभा घेण्यात आली. या प्रसंगी ते उपस्थित होते. या सभेत उपस्थित अनेक जणांंनी विचार मांडले.
या वेळी नानोडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचे सचिव विश्वास गाड म्हणाले, ‘‘वर्ष २०१३ मध्ये शासनाने ही जागा कह्यात घेतली. हे कळल्यावर मंदिर समितीने विरोध केला. त्यानंतर पीडीएने या जागेतून रस्ता दाखवला, तेव्हाही मंदिर समितीने विरोध केला. एवढा विरोध होऊनही शासनाकडून हा प्रकल्प होऊ घातला जात आहे. सर्व धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करावा, असे मी आवाहन करतो.’’
कळंगुट येथील एक समाजसेवक एकनाथ नागवेकर म्हणाले, ‘‘देवी सर्वांचे रक्षण करते. आज देवीच्या जागेच्या रक्षणासाठी आपल्याला एकत्र यावे लागत आहे. आपण या प्रकल्पाला विरोध केला नाही, तर आपल्याला कितीतरी जन्म याचे पाप भोगावे लागेल. हा प्रकल्प बंद झाला पाहिजे, अशी मी मागणी करतो.’’ सुदेश शिरोडकर म्हणाले, ‘‘शासनाने चुकीच्या पद्धतीने देवीची जागा कह्यात घेतली आहे. येथे लोकांच्या भावनांचा प्रश्न आहे. लोकांच्या भावनांचा विचार कोण करणार ? येथील पंच, सरपंच, आमदार कोण विचार करणार ? घरात सांडपाण्याची टाकी बसवण्यासाठी शासनाचे नियम पाळावे लागतात. येथे शासनाने सर्व नियम गुंडाळून ठेवले आहेत.’’
अजून एक नागरिक फर्नांडिस म्हणाले, ‘‘आम्हा लोकांमुळेच हे लोक निवडून येतात. या जागेतील प्रत्येक नारळाचे झाड हे मुलाप्रमाणे आहे. येथे प्रकल्प झाल्यास हा सर्व निसर्ग नष्ट होईल.’’ श्री बाबरेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कोरगावकर म्हणाले, ‘‘शासनाने हा प्रकल्प इतरत्र कुठेही न्यावा; पण हा प्रकल्प या ठिकाणी नको.’’
‘कळंगुट कॉन्स्टिट्युअन्सी फोरम’चे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर म्हणाले, ‘‘जेव्हा हा प्रकल्प करण्याचे नियोजन केले गेले, तेव्हा या मंदिराच्या समितीच्या सदस्यांना याविषयी काहीच कल्पना नव्हती. असे असूनही हा ठराव घेतांना कागदोपत्री मंदिर समितीचे सदस्य आणि सचिव उपस्थित होते, असे दाखवले गेले; म्हणजेच खोटी कागदपत्रे सिद्ध केली गेली.’’
श्री शांतादुर्गा मंदिर नानोडाचे अध्यक्ष श्री. दिगंबर सावंत यांनी हा प्रकल्प येथे नको असे सांगितले. येथील एक नागरिक गुरुदास शिरोडकर म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्यात या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सभा झाली होती. त्यानंतर लोकांनी मंदिराच्या जागेत जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी ‘त्यांना अटक करू’, असे सांगितले. मी तिथे जाऊन देवीचा जयजयकार करत त्या जागेत प्रवेश केला, तेव्हा इतर लोकही देवीचा जयजयकार करत या जागेत आले. तेथे काम करत असलेल्यांना मी हा प्रकल्प होऊ नये, अशी विनंती केली. पोलिसांनी मामलेदारांना कळवले. त्यांनी कागदपत्रे पाहिली, तेव्हा देवस्थानच्या सदस्यांनी आमचा विरोध असतांना हा प्रकल्प चालू करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर मामलेदारांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. श्री शांतादुर्गा देवस्थान समिती आणि इतर मंदिरांचे सदस्य यांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ‘हा प्रकल्प इतरत्र हालवू’, असे आश्वासन दिले आहे.’’
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत म्हणाल्या,‘‘ही जागा मंदिराची जागा आहे. मंदिराच्या उत्पन्नाच्या दृष्टीने या जागेचा वापर व्हावा. या प्रकल्पाला मंदिरांच्या विश्वस्तांचा आणि स्थानिक लोकांचा विरोध आहे. एवढे सगळे असूनही शुक्रवारी येथे बांधकाम चालू करण्यात आले. मंदिराचे पावित्र्य राखले जायला पाहिजे. येथेे मलनिस्सारण प्रकल्प येणे, ही एक विपरीत गोष्ट घडत आहे. या जागेचे पावित्र्य राखले जावे. या मंदिरांच्या सदस्यांची मागणी कशासाठी आहे, याचा शासनाने विचार करावा.’’ सभेच्या शेवटी हा प्रकल्प या जागेतून रहित करण्यात यावा, यासंबंधी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. शेवटी श्री शांतादुर्गा देवस्थान समितीचे उपाध्यक्ष कृष्णकांत कळंगुटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.