वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटासाठी सुवर्णकाळ ठरला ! – राहुल रवैल,चित्रपट निर्माते
५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पणजी, १८ जानेवारी (वार्ता.) – वर्ष १९७० चा काळ हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णकाळ होता. या काळात हिंदी चित्रपटासाठी नवीन संकल्पना, चित्रपट क्षेत्र वृद्धींगत करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आदी प्रकार झाले. या काळात चित्रपट अभिनेत्यांमध्ये निरोगी स्पर्धा होती आणि या काळात कुणीही कुणाचा सूड उगवत नव्हते, असे मत चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी व्यक्त केले. ‘५०, ६० आणि ७० च्या दशकांतील चित्रपटनिर्मिती’, या विषयावर आयोजित परिसंवादात चित्रपट निर्माते राहुल रवैल बोलत होते. या संवाद कार्यक्रमात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने अनेक महनीय व्यक्तींनी सहभाग घेतला.
संवाद कार्यक्रमात राहुल रवैल हिंदी चित्रपटसृष्टीच्या १९५० पासूनच्या प्रवासाविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘वर्ष १९६० मध्ये के. असिफ आणि मेहमूद यांनी अनेक चांगले चित्रपट बनवले. त्यानंतर वर्ष १९७० मध्ये बाबूराम इशरा यांनी ‘चेतना’ चित्रपटाचे अल्प कालावधीत चित्रीकरण करून त्या काळी एक विक्रम केला. या काळात अभिनयाने भरलेला ‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट आला. या काळात अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ चित्रपटाने ‘रागीट युवा पुरुषा’च्या प्रतिमेला जन्म दिला. वर्ष १९७० ते १९८० या काळात हिंदी चित्रपटसृष्टी खर्या अर्थाने बहरली आणि आताही ती बहरत आहे.’’