ग्रामीण भागातील पोलीस ठाणे इमारतीचा प्रश्न सोडवणार ! – शंभूराज देसाई, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री
विटा (जिल्हा सांगली) – राज्याच्या ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील विविध समस्या या टप्प्याटप्प्याने सोडवणार असल्याची ग्वाही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुंबईतील मंत्रालयात ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाच्या प्रश्नांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी खानापूरचे शिवसेना आमदार अनिल बाबर यांनी खानापूर आणि आटपाडी येथील पोलीस ठाणे यांच्या इमारतींचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर शंभूराज देसाई यांनी आटपाडी आणि खानापूर येथील पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव प्राधान्याने सिद्ध करण्याचे निर्देश दिले.
या वेळी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, शिवसेना आमदार श्री. प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन बिहारी, अतिरिक्त पोलीस महासंचालक एस्. जगन्नाथन् आदी उपस्थित होते. या वेळी मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील विशेषतः डोंगरी भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारती या संदर्भात विविध प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून गांभीर्याने विचार करीत आहे.