गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !
सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
१७ जानेवारी या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी आश्रमातील शिकायला मिळालेली सूत्रे याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ६)
भाग ५ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/442225.html
११. साधिकेचे आध्यात्मिक त्रास न्यून करून तिची साधना करवून घेणारी करुणावत्सल गुरुमाऊली !
११ अ. मुलाच्या वेळी गरोदरपणात तीव्र त्रास होणे : वर्ष १९९१ मध्येच मी आणि यजमान आम्ही दोघेही साधना अन् सेवा करू लागलो होतो. वर्ष १९९२ मध्ये मी मुलाच्या (केदारच्या) वेळी गरोदर वेळी होते. मला गरोदरपणात तीव्र त्रास होत होता. त्यामुळे मला काहीही हालचाल न करता पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. मी घरी झोपूनच होते. माझ्या पडताळणीसाठी आधुनिक वैद्यही घरीच येत होते. त्याही स्थितीत मी धामसे येथे घरी एकटी रहात होते. आधुनिक वैद्य मराठे (यजमान) दिवसभर नोकरी करत आणि नंतर अध्यात्मप्रसारासाठी गावोगावी जात होते. माझ्यासमवेत माझी ४ वर्षांची मुलगी अपर्णा आणि १४ वर्षांचा पुतण्या थांबत होता. परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मला या कालावधीत काही अडचण आली नाही. (त्या वेळी ‘सौ. मंगला यांना पूर्वजांचा तीव्र त्रास होत होता’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नंतर आम्हाला सांगितले.) परात्पर गुरुदेवांनी माझे पूर्ण दायित्व घेऊन मला त्या संकटातून सोडवले. त्या वेळी मला झालेला तीव्र त्रास आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यावर केलेल्या उपाययोजना यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
११ आ. गरोदरपणात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !
११ आ १. साधिकेला सतत सत्मध्ये ठेवणे
११ आ १ अ. गरोदरपणात तीव्र त्रास होत असल्याचे समजल्यावर परात्पर गुरुदेवांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची ध्वनीफीत ऐकण्यास आणि त्यांचे चरित्र वाचण्यास सांगणे : मला गरोदरपणात त्रास होत असल्यामुळे आधुनिक वैद्यांनी काहीच हालचाल न करता पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. हे परात्पर गुरु डॉक्टरांना कळल्यावर त्यांनी त्वरित माझ्यासाठी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या भजनांची ध्वनीफीत पाठवून दिली आणि ती दिवसभर ऐकण्यास सांगितली. त्याचसमवेत त्यांनी मला प.पू. बाबांचे ‘नाथ माझा भक्तराज’ हे चरित्र वाचण्यास सांगितले. त्या वेळी मला ‘आध्यात्मिक त्रास वगैरे असतो’, याविषयी काहीच ठाऊक नव्हते.
११ आ १ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांनी लिहिलेल्या अध्यात्मावरील सूत्रांचे वर्गीकरण करण्याची सेवा देऊन सतत सत्मध्ये ठेवणे : मला परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गांना जाता येत नव्हते आणि साधकांना भेटताही येत नव्हते. अशा वेळी मला ‘आध्यात्मिक लाभ व्हावेत’; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरच प्रयत्न करत होते. (हे आम्हाला नंतर कळले.) मी ‘नाथ माझा भक्तराज’ हा ग्रंथ ३ वेळा वाचून काढला. प.पू. बाबांच्या भजनांची ध्वनीफीतही मी सतत ऐकत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनाच माझी पुष्कळ काळजी होती. त्यांनी मला ‘अध्यात्म’ या विषयावर त्यांनी लिहिलेल्या सूत्रांचे कागद पाठवले. त्यांचे मी पलंगावर झोपूनही वर्गीकरण करू शकत होते. त्या धारिकेत स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेली सूत्रे असल्यामुळे ती वाचून माझा अभ्यासही होत होता आणि त्यातून मला चैतन्यही मिळत होते. अशा प्रकारे ते मला सतत सत्मध्ये ठेवून माझी अगदी आईप्रमाणेच काळजी घेत होते.
११ इ. त्रास न्यून करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः सांगितलेले उपाय !
११ इ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी धामसे येथे येण्याचे नियोजन नसतांनाही अकस्मातपणे अभ्यासवर्गात धामसे येथे जाणार असल्याचे सांगणे : मला त्रास होत असल्यामुळे ‘माझा अभ्यासवर्ग चुकत आहे’, याविषयी मला पुष्कळ खंत वाटत होती. त्याचसमवेत परात्पर गुरु डॉक्टरांना भेटता येत नाही; म्हणून मला पुष्कळ वाईट वाटून रडू येत असे. यजमान पहाटेच उठून अभ्यासवर्गासाठी निघून जात होते. मला ८ वा मास लागला. त्या मासात पणजी येथे परात्पर गुरुदेवांचा अभ्यासवर्ग होता. या अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टर शिकवत असतांना अकस्मातपणे म्हणाले, ‘‘आज संध्याकाळी अभ्यासवर्ग संपल्यावर मी धामशाला जाणार आहे.’’ हे त्यांच्या पूर्वनियोजनाप्रमाणे नव्हते. त्यामुळे आयोजक साधकांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. त्या दिवशी सायंकाळी परात्पर गुरु डॉक्टर आणि सर्व साधक धामसे येथे घरी आले.
११ इ २. आधुनिक वैद्यांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले असूनही परात्पर गुरुदेव घरी येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी गोड शिरा करणे आणि सहसाधकांनी बाहेरून पुष्कळ पदार्थ आणले असूनही त्यांनी केवळ शिराच खाणे : परात्पर गुरु डॉक्टर घरी येणार असल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मला आधुनिक वैद्यांनी हालचाल न करण्यास सांगितले होते; परंतु तरीही मी उठून गोड शिरा केला आणि घर आवरले. सहसाधकांनी येतांना फळे आणि इतर सुका खाऊ असे पुष्कळ पदार्थ आणले होते. ते सर्व पटलावर मांडून ठेवले होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांतील केवळ शिराच पुष्कळ खाल्ला. ‘मी काही करू शकत नसल्याने केवळ एकच पदार्थ बनवला आहे’, याची त्यांना जाणीव होती.
११ इ ३. साधिकेला परात्पर गुरु डॉक्टरांना खाली वाकून नमस्कार करता येणे शक्य नसल्यामुळे तिने खाली बसून त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करणे आणि त्यांनीही तो गर्भासाठी आवश्यक असल्यामुळेच करू देणे : आरंभापासूनच परात्पर गुरु डॉक्टर सहसा कुणाकडूनही स्थुलातून नमस्कार करून घेत नव्हते. ते आमच्या घरी आले, तेव्हा मला ८ वा मास लागला होता. मला वाकता येत नव्हते. त्यात मला वेळेआधीच बाळ (‘प्रिमॅच्युअर बेबी’) होण्याची शक्यता होती, तरीही मला आतूनच परात्पर गुरु डॉक्टरांना वाकून नमस्कार करण्याची तीव्र इच्छा होत होती; म्हणून मी कसेबसे प्रयत्न करून त्यांच्याजवळ खाली बसले आणि त्यांच्या चरणांवर डोके ठेवले. गर्भातील बाळासाठी हे सर्व आवश्यक होते; म्हणूनच त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी नकार न देता माझ्याकडून नमस्कार करवून घेतला.
११ इ ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेच्या वडिलांना ६ मास (महिने) दत्ताचा नामजप करण्यास सांगणे : त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी मला १ घंटा तेथेच आसंदीत बसायला सांगितले आणि ते अन्य विषयांवर इतर साधकांशी बोलत बसले. काही वेळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी अकस्मात् मला आणि यजमानांना सांगितले, ‘‘सौ. मंगलाच्या वडिलांना ६ माळा ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ हा नामजप ६ मास करण्यास सांगा.’’ तेव्हा आमच्यासह सर्वांनाच ‘हे सर्व काय चालले आहे ?’, हे काही कळत नव्हते.
११ इ ५. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेसाठी केलेल्या उपायांचे विश्लेषण : एका साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘तुम्ही पूर्वनियोजन नसतांना इथे आलात आणि ‘मराठे यांनी काही विचारले नसतांनाही त्यांना नामजप सांगितलात’, हे सर्व काय आहे ?’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी समवेत आलेल्या सर्व साधकांना पुढील सूत्रे सांगितली.
अ. ‘‘सौ. मंगलाला तिच्या माहेरकडून पूर्वजांचा त्रास होत आहे. त्यामुळे आपण अभ्यासवर्गात असतांना देवाने मला इथे येण्याविषयी सुचवले.
आ. तिच्या वडिलांना दत्ताचा नामजप करायला सांगितला; कारण तिला अजून २ बहिणी आहेत. ‘त्या पुढे ज्या २ घराण्यांत जातील, तेथे त्यांना हा त्रास होऊ नये’, यासाठी सौ. मंगलाच्या वडिलांना नामजप करण्यास सांगितला.
इ. सौ. मंगलाला काही होणार नाही; कारण तिच्यावर गुरुकृपा आहे.’’
अशा प्रकारे त्यांनी केवळ साधना करणार्या साधकाचाच नव्हे, तर त्या साधकाशी निगडित अनेक घराण्यांचाही उद्धार केला आहे, आताही ते करत आहेत आणि यापुढेही करणार आहेत !
१२. बाळंतपणानंतर अनुभवलेले गुरुमाऊलीचे वात्सल्य !
१२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचा पणजी येथे अभ्यासवर्ग असतांना साधिका बाळंतीण होणे, तेव्हा स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून रुग्णालयात जाऊन साधिकेची भेट घेणे : केदारचा जन्म झाला, त्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांचा पणजीला अभ्यासवर्ग होता. ‘अभ्यासवर्ग घेणे; त्यानंतर पुढील अभ्यासवर्ग, प्रसार आणि सेवा यांचे नियोजन करणे; साधकांना भेटणे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा व्यस्त दिनक्रम असे. त्यांना मोकळा वेळ मिळत नसे, तरीही ते वेळात वेळ काढून फोंडा येथील रुग्णालयात मला भेटायला आले होते. येतांना ते समवेत १० – १२ साधकांनाही घेऊन आले होते. ते अनुमाने २ घंटे रुग्णालयात थांबले होते.
१२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या रुग्णालयातील केवळ अस्तित्वामुळे रुग्णालयातील खोलीची शुद्धी होणे आणि बाळाचा त्रासही दूर होणे : त्या वेळी ‘ते मला सत्संग देत होते आणि बाळाला जवळ घेऊन त्याला होत असलेला आध्यात्मिक त्रास दूर करत होते’, याची आता आम्हाला जाणीव होते. त्यांनी १० – १५ मिनिटे बाळाला उचलून घेतले. त्यांनी मला आणि बाळाला होणार्या आध्यात्मिक त्रासासाठी प्रत्येक टप्प्यावर उपाय सांगितले. ते रुग्णालयात आल्यामुळे ‘त्यांच्या अस्तित्वाने रुग्णालयातील आमच्या खोलीची शुद्धीही झाली होती’, याची आता मला जाणीव होते. तेव्हा आम्हाला आध्यात्मिक त्रास, त्यावरील उपाय किंवा संतांचा संकल्प आणि अस्तित्व यांमुळे हा त्रास न्यून होतो’, यांविषयी काहीही ठाऊक नव्हते. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे सर्व आम्हाला प्रत्यक्ष प्रसंगातून आणि कृतीतून शिकवले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)
भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/443195.html
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |