सोयीस्कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य !
शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने ‘मंदिरात प्रवेश करतांना सभ्य पोशाख परिधान करा’, असे आवाहन केल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जागृत झालेल्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानला तालिबानी ठरवले. शिर्डी संस्थानच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनानेही शासकीय कार्यालयात ‘टी शर्ट’ आणि ‘जीन्स’ परिधान करण्यावर बंदी घातली. शासनाच्या या निर्णयावरही ‘तृप्ती देसाई खवळून उठतील’, असे वाटले होते; पण त्यांच्या तोंडातून आवाजही बाहेर आला नाही. केवळ वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्धी मिळण्यासाठीच त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कंठ फुटला होता. शिर्डीमध्ये फलक काढण्याचा प्रयत्न करणार्या तृप्ती देसाई यांनी शासकीय कार्यालयात लागू केलेल्या ‘ड्रेसकोड’मुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले नाही का ? याचे उत्तर प्रथम द्यावे.
कोणते कपडे घालायचे, याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असते; म्हणून कुणी नग्न फिरायला लागला, तर त्याला निर्लज्जपणा किंवा स्वैराचार म्हणतात. याचे भान लहान मुलालाही असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सभ्यतेचे कोंदण असावे लागते. संस्कृती, सभ्यता, पावित्र्य या शब्दांपर्यंत जाण्याची कुवत नसल्यामुळे तृप्ती देसाई यांना एवढे कळले, तरी पुरेसे आहे. त्यांना जर याविषयीची समज असती, तर मंदिरात प्रवेश करतांना सभ्य पोशाख घालण्याच्या सूचनेविषयी त्यांनी वाचाळपणा केला नसता.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश असतो. गणवेशात न येणार्या विद्यार्थ्याला शिक्षा केली जाते. येथे कुणी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’, असे म्हटले, तर त्याला मूर्ख नाही, तर काय म्हणणार ? तृप्ती देसाई यापेक्षा वेगळे काय करत आहेत ? मंदिरात प्रवेश करतांना कोणते कपडे घालावेत ? हे भाविकांना कळते, तरीही काही आधुनिक विचारांची मंडळी तोकड्या कपड्यांमध्ये मंदिरात जातात. त्यांच्यासाठी सूचना फलक लावला, तर येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय येतोच कुठे ? वाहन चालवणार्या व्यक्तीला वाहतुकीचे नियम ठाऊक असतात; पण तरीही रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीचे नियम लावलेले असतातच. याला कुणी स्वत:चा अपमान समजत नाही, असो. शेवटी राज्यघटनेने सर्वांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी या अधिकाराचा सन्मान ठेवलाच पाहिजे.
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई