मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मांजाने गळा चिरला
चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?
मुंबई – वरळी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी दुचाकीवरून न्यायालयात जात असतांना नायलॉन मांजाने त्यांचा गळा चिरला. वेळेत उपचार मिळाल्याने राकेश गवळी यांचा जीव वाचला.
राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. जे.जे. मार्ग चौकात अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याजवळ आला. दुचाकीवर नियंत्रण मिळवतांना मांजाने कधी गळा चिरला, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. त्यांच्या गळ्यातून रक्त येतांना पाहून कर्तव्यावरील वाहतूक पोलीस साहाय्याला धावून आले. त्यांनी गवळी यांना लगेचच जे.जे. रुग्णालयात नेले. त्यांच्या गळ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करून १० टाके घालण्यात आले.