पोर्तुगीज राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या विरोधातील कुंकळ्ळीतील संघर्ष !
‘ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना सासष्टीत कडाडून विरोध केला, तो कुंकळ्ळी आणि असोळणे या गावांतील गावकर्यांनी. या गावात देवळे होती. या गावांतील लोक जागरूक आणि लढवय्ये असल्यामुळे मिशनरी तेथे स्थिर झाले नव्हते. एके रात्री पोर्तुगिजांनी आक्रमण करून असोळणे गाव जाळून भस्मसात केले. ओडलीचा व्हिगारियू पाद्री आंतोनियू फ्रांसिश्कु याने देवालयांना आग लावली. रायतूरचा कॅप्टन लगेच ससैन्य कुंकळ्ळीवर चालून गेला. त्याने या गावातील सर्व लहान मोठ्या देवळांना आग लावली. तेथील हिंदू जीव मुठीत घेऊन पळाले. पोर्तुगीज सैन्य परतल्यावर ग्रामस्थ पुन्हा परतले. त्यांनी गाव पुन्हा उभा केला, घरे बांधली, गावातील भस्म केलेले भव्य देवालय त्यांनी पुन्हा उभे केले. आणखी पाच देवळे बांधली. काही दिवसांनी पुन्हा पोर्तुगिजांनी आक्रमण केले. त्यात त्यांनी सर्व माड तोडले, पिकांची नासाडी केली. त्यांनी गावात एक मेढेकोट निर्माण केला आणि त्यात आपले सैन्य ठेवले. या सैन्यातील मानुएल ताशैर, पेरू बेर्नो, आफोंसू पाशेकु या पाद्रींनी गावात नव्याने बांधलेली सर्व देवालये मोडून टाकली. राजसत्तेच्या जोरावर ख्रिस्ती धर्मसत्ता आपल्यावर आक्रमण करत आहे, याची चीड कुंकळ्ळीवासियांना आली होती.
१५ जुलै १५८३ ची एकजूट !
१५ जुलै १५८३ चा तो दिवस सोमवार होता. प्रभात काळी पाद्रींनी मास म्हटला आणि आठ वाजायला सात मिनिटे कमी असतांना सर्वांनी कुंकळ्ळीला जायला प्रस्थान सोडले. कुंकळ्ळी गावात या पाद्रींसाठी मंडप उभारला असा निरोप पहाटेलाच पुढे पाठवला होता. ते दिवस पावसाळ्याचे होते. मंडप आवश्यक होता. कुंकळ्ळी गावात समजले होते की, ते पाद्री जागा बघून लवकरच चर्च बांधणीचे काम चालू करणार आहेत. त्यामुळे गावच्या हिंदूंनी मंडप घालणार्या ख्रिस्त्यांना सहकार्य केले नाही. त्यांनी तातडीने ग्रामसभा बोलावली. त्या सभेत ठरले की, पाद्री आले, तर देवालये उद्ध्वस्त करण्याच्या दुष्कृत्याचे जनक म्हणून त्यांच्यावर सूड उगवावा. एवढे होईपर्यंत पाद्रींच्या जथ्याने नदी पार केली. जथ्था कुंकळ्ळी गावात शिरतांच गावातील प्रतिष्ठित असा एक हिंदु गृहस्थ पाद्रींना भेटायला आला. त्याने त्यांना अभिवादन करून त्यांचे स्वागत केले आणि सांगितले की, जेवण करून सगळे लोक त्यांना भेटायला येणार आहेत. तो गृहस्थ गेल्यानंतर लोकांचा एक मोठा घोळका आला. त्यात पुरुष होते, स्त्रिया होत्या आणि मुलेही होती. त्यांच्यामध्ये एक माणूस वेड्यासारखा ओरडत होता. तो घाडी असावा. तो एवढे जलद बोलत असे की, ऐकणार्याला स्पष्ट अर्थबोध होत नसे. तो अधून मधून ‘लढाई’, ‘लढाई’ असे म्हणत असे. ‘आताच ही संधी आहे. फासांत ते अडकले आहेत’, असेही म्हणत असे. ‘‘हा चांगला नजराणा आहे. पुष्कळ मुंडक्यांचा’’ असे तो पुन्हा पुन्हा म्हणत असे. पाद्रींनी विचारले, ‘‘ हा माणूस काय बोलतो ?’’ त्या वेळी ‘सैतानांनी गाव सोडून जावे’, असे तो म्हणतो’, असे त्यांना सांगण्यात आले.
पाद्रींनी मंडपात गावकर्यांची प्रतीक्षा केली; पण कुणीच त्यांच्याकडे आले नाही. पाद्रींवर नजर लावून इकडून तिकडे काही हिंदू फिरत होते. जणू ते गुप्तहेर होते. तेथे ‘एक चर्च बांधावे’, ‘एक क्रॉस उभारावा’ असे काहीतरी ते पाद्री आपसांत बोलत होते. तेवढ्यात ज्याने पाद्रीचे प्रथम स्वागत केले होते, तो गृहस्थ उठला आणि हातांत दोन काठ्या, एक उभी आणि दुसरी तिच्यावर आडवी धरून तो माडाच्या बुंध्याजवळ गेला. त्या काठ्या धरून म्हणाला, ‘‘इथे क्रॉस चांगला दिसणार नाही का ?’’ ही खूण दिसताच गुप्तहेरासारखे फिरणारे ते हिंदू गायब झाले. तेथे असलेल्या पोतुगिजांनी काळोजी नाईक अन् सूर्या चाटी या गावच्या दोन प्रतिष्ठित गृहस्थांना बोलावणे पाठवले. त्यांची घरे जवळच होती. काळोजी आला; पण सूर्या चाटी आला नाही. ‘सूर्या का आले नाही, तसेच पाद्रींना भेटायला गावकरी का आले नाहीत ?’ असे पोर्तुगिजांनी काळोजीला विचारले. त्याने उत्तर दिले की, गावकर्यांमध्ये त्या सूत्रावर एकमत नाही, म्हणून ते आले नाहीत. तेथे असलेल्या पोर्तुगिजांनी काळोजी नाईकला पाद्री रोदोल्फुकडे नेले. पाद्री रोदोल्फुकडे त्याला सांगितले की, लोकांमधील वैमनस्य नाहीसे करावे. काळोजीने सांगितले की, ‘आपण हे संभाषण आपल्या बंधूंना, नातेवाइकांना सांगून पुढे काय करायचे ते ठरवीन.’ एवढे सांगून तो गेला. गोंसालू रुद्रीगिश या कारकुनाच्या मनात होते की, काळोजीला ठेवून घ्यावे, जायला देऊ नये, कारण त्याच्या मनात काही संशय निर्माण झाला असावा; पण बळजबरीने त्याला ठेवणे शक्य नव्हते. घाडी मोठमोठ्याने ओरडत होता आणि गावातील लोक पाद्रीजवळ येत नव्हते. घाडी मोठमोठ्याने ओरडू लागला तसा त्याच्या ओरडण्याचा आशय स्पष्ट समजणे पाद्रींना शक्य झाले. त्याने पाद्रींच्या उरात धडकी भरू लागली. ओडलीला परतण्यासाठी त्यांनी नदीकडे जायचे ठरवले; पण त्या जथ्यातील काही लोक काही खाण्याच्या वस्तू विकत घेण्यासाठी बाजारात गेले होते. त्यामुळे ते परत येईपर्यंत त्यांना थोडा वेळ थांबावे लागले.
असा उगवला सूड !
एवढ्यात अचानकपणे देवळाच्या बाजूने मोठ्या आरोळ्या उठल्या. बाजारात गेलेले जथ्यातील लोक धावत पळत येत असलेले पाद्रींनी पाहिले. त्यांच्यामागोमाग लोकांचा मोठा जमाव येतांना त्यांना दिसला. काही माणसांच्या हातात भाले होते, काहींच्या हातांत तलवारी होत्या, तर काही धनुष्यबाणांनी सज्ज होते. ते ओरडत होते, ‘आमच्या प्रदेशाची शांतता भंग करणार्या आमच्या देवांचे शत्रू असलेल्या, देवालये उद्ध्वस्त करणार्या लोकांना ठार करा.’ ते पाद्रींवर आक्रमण करणार, असे स्पष्ट दिसले. ओडलीचे ख्रिस्ती पाद्रीच्या जथ्यात होते. हल्लेखोरांना अडवण्यासाठी ते पुढे सरसावले. ‘पाद्री गुन्हेगार नाहीत’, असे त्यांनी ओरडून सांगितले. प्रत्त्युत्तरादाखल गावच्या लोकांनी त्या जथ्यावर बाणांचा वर्षाव केला. दोन तरुण शस्त्र परजत पुढे सरसावले. रेक्टर कोण हे त्या तरुणांना ठाऊक होते. प्रथम त्याच्या गुडघ्यावर घाव घातला. त्यानंतर त्याच्या मानेेवर प्रहार केल्यावर तो गतप्राण झाला. त्याचवेळी ब्रदर फ्रांसिश्कू आरान्य कुंपण उल्लंघित असतांना त्याच्यावर आक्रमण झाले. त्याच्या बरगड्यात भाला घुसल्यावर तो अर्धमृत अवस्थेत कोसळला. पाद्री पेरू बेर्नु हा तिसरा बळी. त्याचा डोळा फोडला आणि कान कापला गेला. पाद्री आफोंसू पाशेकु याचीही तीच अवस्था झाली. पाद्री आंतोनियु फ्रांसिश्कु याच्या डोक्यावर प्रहार करण्यात आले. तो लगेच गतप्राण झाला. अशा तर्हेने वर्ष १५८३ ला पाच धर्मोपदेशकांचा खवळलेल्या हिंदु जनतेने वध केला. त्यांच्यासह दोन ख्रिस्ती ब्राह्मण मुलांचाही लोकांनी वध केला. एकाचे नाव दुमिंगुश अन् दुसर्याचे आफोंसु असे होते. ही दोन्ही मुले पाद्रीचे नोकर होती. पूर्वी पाद्रींनी कुंकळ्ळीची देवळे मोडली. त्या वेळी दुमिंगुश कुर्हाडीचा दांडा होऊन देवळे दाखवायला पाद्रीसह फिरत असे. अशा प्रकारे आणखी तीन फितुरांना ठार करण्यात आले. सगळा कुंकळ्ळी गाव यांच्या विरोधात एकजुटीने उभा ठाकला होता.
पोर्तुगिजांचे कपट !
पोर्तुगीज साम्राज्याला झालेला हा विरोध शासन कसा सहन करील ? गोमिजियानीश द फिगैरेंदु या रायतूरच्या किल्लेदाराने कुंकळ्ळीच्या सोळा प्रमुख पुढार्यांना असोळणे येथे विश्वासघाताने पकडले. त्यातील एकाला जीवदान दिले. एक पळून गेला. राहिलेल्या चौदा वीरांना पोर्तुगीज सैनिकांनी कंठस्नान घातले; पण त्यापूर्वी घडलेल्या घटनेचा धाक सरकारने घेतला होता. म्हणूनच सैन्य पाठवून कुंकळ्ळीच्या लोकाचा बीमोड करायला पोर्तुगीज धजले नाहीत.
गोमंतकात ख्रिस्ती धर्म तेथील मूळच्या हिंदु आणि मुसलमान धर्मियांनी स्वेच्छेने स्वीकारला. तो धर्म पोर्तुगिजांनी आणि मिशनर्यांनी त्यांच्यावर लादला नाही, असे भासवण्याचा प्रयत्न पोर्तुगीज सरकार आणि मिशनरी इतिहासकारांनी केला; पण त्यांनीच लिहून ठेवलेल्या या घटनेवरून सिद्ध होते की, गोमंतकातील जनता पोर्तुगिजांच्या आणि मिशनर्यांच्या धार्मिक छळाला आणि आक्रमणाला एवढी वैतागली होती की, पतंगाने दिव्यावर झेप घ्यावी, तशी ती पोर्तुगीज सत्तेच्या स्थंडिलेवर आत्मबलीदान करत होती. गोमंतकीय जनता सहिष्णु वृत्तीची आणि शांतताप्रिय आहे. वर्ष १५८३ मधला कुंकळ्ळीकरांचा उठाव आणि त्यांनी घेतलेले दहा बळी हेच दर्शवतात की, धर्मच्छलाचा अतिरेक झाल्यामुळे शांतताप्रिय लोकही क्षुब्ध होऊ शकतात.’
(संदर्भ : लेखक – मनोहर हिरबा सरदेसाई, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, खंड १)
धर्माभिमानासाठी बलीदान देणार्या पूर्वजांच्या शौर्याच्या स्मृती जपणारे आदर्श कुंकळ्ळीवासीय !श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरापासून काही अंतरावर रस्त्यात १ कमान उभारण्यात आली आहे. ती देऊळ जवळ आल्याचे सूचित करते. त्या कमानीच्या मागच्या बाजूला ‘वीर देसाईचा घोडा पोर्तुगीज सैनिकाला चिरडून टाकण्यासाठी त्याच्या डोक्यावर पाय ठेवतो’, असे चित्र आहे. हे चित्र पहाताच पोेर्तुगिजांचा अत्याचार येथील देसाईंनी कसा मोडून काढला असेल त्या इतिहासाचे चित्र डोळ्यांसमोर उभे करते आणि त्यामुळे पुढील पिढीला आपले पूर्वज कसे शूरवीर होते, याची झलक देऊन प्रेरणा मिळते. |