आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी या दिवशी स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला आरंभ होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वेगळे पटल असून १ घंट्यात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पहायला मिळाली. बर्याच ठिकाणी अस्पष्ट उमेदवारी चिन्हामुळे वृद्ध व्यक्तींना मतदान करण्यासाठी निर्माण झालेली अडचणही उमेदवारांसाठी तोट्याची ठरू शकते.
तालुक्यातील कोलगाव, तळवडे, मळगाव, इन्सुली या ग्रामपंचायतींवर सर्वांचे लक्ष लागून आहे; मात्र त्यांपैकी कोलगाव ग्रामपंचायतीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मतदानादिवशी कोलगावात हळद, तांदूळ, लिंबू रस्त्यावर आल्याने या ठिकाणी जादूटोण्याची चर्चा सर्वत्र चालू होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही दंगल नियंत्रण पथकासह कोलगावमध्ये दिलेली भेट चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे कोलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.