श्रीराममंदिर उभारणीसाठी अवैध देणगी गोळा केल्यावरून राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंद
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी अवैधरित्या देणगी गोळा केल्याच्या आरोपावरून येथील पोलिसांनी राष्ट्रीय बजरंग दलाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
याविषयी ‘राममंदिर निधी समर्पण समिती’चे मंत्री प्रभात गोयल यांनी सांगितले की, आमचे काही कार्यकर्ते येथील कृष्णानगरमधील काही भागांमध्ये श्रीराममंदिरासाठी देणग्या गोळा करण्यासाठी गेलो असता ‘दोन दिवसांपूर्वीच आम्ही देणग्या दिल्या आहेत’, असे स्थानिकांनी सांगून त्यांनी पावत्याही दाखवल्या. यानंतर आम्ही शोध घेतला असता ‘राष्ट्रीय बजरंग दल’ नावाच्या संघटनेकडून त्या गोळा करण्यात आल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी देणग्या जमा करण्याचा अधिकार कुणाला नाही. विश्व हिंदु परिषदेची युवा संघटना बजरंग दल आहे. ‘राष्ट्रीय बजरंग दला’चा आणि विश्व हिंदु परिषदेचा काहीही संबंध नाही. त्यामुळे कथित ‘राष्ट्रीय बजरंग दला’विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. आमच्या बजरंग दलाला अपकीर्त करण्याचा हा कट आहे. संबंधित संघटनेने आमच्या पावत्यांची नक्कल करून बनावट पावती पुस्तक छापले आहे. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकार्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.