बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले
राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलीस यांंमध्ये शाब्दिक बाचाबाची
बेळगाव, १७ जानेवारी – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर १७ जानेवारी या दिवशी अडवले. ते महाराष्ट्र्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघाले होते. या वेळी राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषण दिल्या.
कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध ! – राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क आहे; मात्र देशाचे गृहमंत्री अमित शहा बेळगावात येत असतांना तो अधिकार नाकारला जात असल्याने आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी या वेळी सांगितले.