लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता – गृहमंत्री
मुंबई – राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले असून याचा अपलाभ सायबर हल्लेखोरांकडून घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वटरद्वारे केले आहे.
काही सायबर हल्लेखोर नागरिकांना दूरध्वनी करून या लसीची नोंदणी करण्यासाठी भ्रमणध्वनीवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिनकोड आणि इतर वैयक्तिक माहिती घेऊन आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, आपली कोणतीही माहिती उघड करू नये, असे गृहमंत्री देशमुख यांनी आवाहन केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीकरणाविषयी अशा प्रकारचे दूरध्वनी आले असतील, तर त्यांनी याची माहिती पोलिसांना द्यावी किंवा महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.