नागपूर येथे ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना समाज कल्याण अधिकार्याला अटक
भ्रष्टाचाराने पोखरलेले जिल्हा परिषद प्रशासन !
नागपूर – निवासी शाळेच्या महिला लिपिकाकडून ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी.) येथील जिल्हा परिषदेतील समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके (वय ५६ वर्षे) यांना १५ जानेवारी या दिवशी रंगेहात पकडून अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार महिला या विशेष निवासी शाळा नागपूर येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहेत. (अशा भ्रष्ट अधिकार्यांना नुसते निलंबित करून चौकशी नको, तर कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
तक्रारदार या अनुकंपा तत्त्वावर विशेष निवासी शाळा येथे मागील वर्षी नियुक्त झाल्या आहेत. त्यांचा एक वर्ष परिविक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी कायमस्वरूपी पद मान्यतेसाठी त्यांचा प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयात पाठवला; मात्र १३३ दिवसांनंतर या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे सांगून हा प्रस्ताव पुन्हा तक्रारदारांकडे पाठवण्यात आला होता. त्यांनी या प्रस्तावामधील त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव समाज कल्याण अधिकार्याकडे परत पाठवला; मात्र हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आला नाही. याविषयी तक्रारदार यांनी समाज कल्याण अधिकारी अनिल वाळके यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव मान्य करण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली.