कै. स्वयं संदीप तांबे (जिल्हा रत्नागिरी) याच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
कै. स्वयं संदीप तांबे (कळंबस्ते, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) याच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
कै. स्वयं संदीप तांबे (कळंबस्ते, तालुका चिपळूण) याचे पौष शुक्ल पक्ष पंचमी (१८ जानेवारी) या दिवशी नवम मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्ताने त्याच्याविषयी त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
(‘स्वयं उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला होता आणि वर्ष २०१६ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)
१. ‘स्वयंचे केस इयत्ता पाचवीपासूनच पिकायला लागले. त्याच्या गळ्यातील ताईत किंवा पदक १ मासाच्या आतच गळून पडत असत.
२. ‘त्याला वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत राहू आणि शनि यांचा त्रास आहे’, असे त्याच्या पत्रिकेत लिहिले होते.
३. स्वयंच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे
३ अ. संतांनी सांगितलेला नामजप आणि प्रार्थना करायला लागल्यापासून त्रासांमध्ये घट होणे : ‘स्वयंला (वय १५ वर्षे) आध्यात्मिक त्रास होता. याविषयी मी सद्गुरु सत्यवानदादांना (सद्गुरु सत्यवान कदम यांना) विचारल्यावर त्यांनी नामजप सांगितला. तो नामजप आणि प्रार्थना करायला लागल्यापासून त्याच्या त्रासांमध्ये पुष्कळ घट झाली. त्याच्या वागण्या-बोलण्यातही पुष्कळ पालट झाला.
३ आ. दळणवळण बंदी चालू झाल्यावर कोणत्यातरी कामामध्ये स्वतःचे मन रमवणे आणि इतर मुले बाहेर खेळत असतांना स्वतः घराच्या गेटच्या बाहेर न जाणे : दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर त्या संदर्भातील सूचना सांगितल्यावर स्वयं त्यांचे पालन करत होता. तो श्री दुर्गादेवी, शिव आणि दत्त यांचा नामजप करत असे. तो झाडे तोडणे, लाकडे फोडणे, झाडांना माती घालून बाजूने कौले लावून बाग सजवणे इत्यादी कामे करून स्वतःचे मन रमवत होता. इतर मुले बाहेर खेळत असत, तरीही तो गेटच्या बाहेर जात नसे.
घरच्या कामात स्वयंचा मोठा हातभार होता. तो कधी कुणाला उलट बोलत नसे. तो सर्वांना धीर देत असेे. त्याचे बोलणे वेगळेच होते. एखाद्याशी नवीन ओळख झाली, तरी तो त्यांना आपलेसे करून घेत असे.
४. मृत्यू – मित्राचा दूरभाष आल्यावर त्याच्या समवेत पोहायला जाणे, स्वयंला बुडतांना पाहून मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणे; मात्र त्याला यश न आल्याने स्वयंचा मृत्यू होणे : माझा हा गुणी मुलगा; पण ‘काळाच्या मनात काय होते ?’, हे ठाऊक नाही. २ दिवसच तो घराबाहेर पडला. त्या २ दिवसांत त्याचा घरच्यांशी संपर्क अल्प होता आणि तो पुष्कळ वेळ बाहेर रहात असे. रविवारी तो बाहेर पडला आणि घरी परत आलाच नाही. परत आल्या, त्या केवळ त्याच्या आठवणीच !
२४.५.२०२० या दिवशी त्याला त्याच्या मित्राचा दूरभाष आला. मित्र त्याला म्हणाला, ‘‘चल, पोहायला जाऊया’’; म्हणून तो गेला. स्वयंला बुडतांना पाहून मित्राने त्याला वाचवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण यश आले नाही. मुलांकडून तो गेल्याचे कळले.
५. स्वयंच्या मृत्यूने सर्व जणांना हळहळ वाटणे, आईच्या मनात नकारात्मक विचार येणे आणि गुरुमाऊलींच्या कृपेने त्याला शेवटचे पहाता येणे : त्याच्या जाण्याने घरचे सर्व जण खूप दुःखी झाले. सर्व मित्रमंडळी, साधक आणि संत यांच्याही डोळ्यांत पाणी आले. ही घटनाच पुष्कळ धक्कादायक होती. माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती. ‘जगायचे कुणासाठी ? आता आपला उपयोगच नाही’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येत होते. डोळ्याला डोळा लागत नव्हता कि पोटाला भूक नव्हती; पण गुरुमाऊली, तुम्हालाच सर्वांची काळजी ! केवळ तुमची कृपा म्हणून त्याला शेवटचे व्यवस्थित पहायला मिळाले.
६. मृत्यूनंतर तिसर्या दिवशी संतांचा सत्संग लाभल्यामुळे स्थिर होता येणे : मला स्वतःला सावरता येत नव्हते. मला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी घरच्यांनी आणि साधकांनी पुष्कळ प्रयत्न केले. तिसर्या दिवशी सद्गुरु सत्यवानदादा आणि सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) यांचा सत्संग लाभला. ‘देवा, तूच सद्गुरूंचा सत्संग दिलास आणि मला हळूहळू स्थिर केलेस. त्याविषयी मी पुष्कळ कृतज्ञ आहे. गुरुमाऊली, एवढा मोठा दुःखाचा डोंगर पार करण्यासाठी तुम्ही मला नवीन दिशा दिलीत. भगवंता, ‘आता मला केवळ तुम्हीच हवे आहात. आता मला या मायेत अडकायचे नाही. मला या मायेतून बाहेर काढा. गुरुमाऊली, माझ्या मुलाला तुमच्या चरणी ठेवा, त्याला पुढची गती मिळू दे’, हीच प्रार्थना आहे.
७. स्वयंच्या मृत्यूनंतर १२ दिवसांमध्ये अनुभवायला मिळालेली सूत्रे
७ अ. तिसर्या रात्री स्वप्नात स्वतःभोवती काही पुरुष आणि स्वयं उभा असलेला दिसणे आणि विभूती फुंकरल्यावर भोवती असलेले पुरुष दिसेनासे होणे : स्वयं गेल्यानंतर तिसर्या रात्री मला एक स्वप्न पडले. त्यामध्ये मी झोपले असून माझ्याभोवती काही पुरुष होते आणि पायांजवळ स्वयं उभा होता. ‘हे सर्व काय करत आहेत ?’, हे मला काहीच कळत नव्हते. त्या वेळी देवाने विभूती फुंकरण्याचे माझ्या लक्षात आणून दिले. त्याप्रमाणे लगेच विभूती फुंकरल्यावर भोवती असलेले पुरुष दिसेनासे झाले आणि स्वयं एकटाच दिसत होता.
७ आ. जपाला बसतांना मला स्वयं दिसत असे. त्या वेळी मी त्याला ‘नामजप आणि प्रार्थना करणे, दत्ताचा जप करणे’, असे प्रयत्न करण्यास सांगितले.
७ इ. सातव्या दिवशी स्वप्नामध्ये ‘स्वयंला कुणीतरी त्रास देत आहेत’, असे दिसल्यावर स्वयं भोवती संरक्षक कवच निर्माण होण्याविषयी प्रार्थना करणे, त्या वेळी त्यांचे त्रास देणे बंद होणे आणि ‘चिंता करू नका, सर्व देवावर सोपवा’, असे गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगितल्यावर मन स्थिर होणे : सातव्या दिवशी स्वप्नामध्ये ‘स्वयंला कुणीतरी त्रास देत आहेत’, असे दिसल्यावर मी लगेच प्रार्थना केली. त्याच्याभोवती संरक्षक कवच निर्माण होण्याविषयी प्रार्थना केल्यावर त्यांचे त्रास देणे बंद झाले; पण माझ्या मनाला पुष्कळ रुखरुख लागली आणि मन अस्वस्थ झाले. दुसर्या दिवशी सकाळी गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलतांना गुरुदेवांना झालेला सर्व प्रसंग सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘तुम्ही काहीही चिंता करू नका. सर्वकाही ठीक होईल. तुम्ही जप आणि प्रार्थना करा. बाकी सर्व देवावर सोपवा.’ नंतर माझे मन स्थिर झाले.
७ ई. अकराव्या दिवशी ‘नारायण नागबळी’ विधी करण्यात पुष्कळ अडथळे येणे, नंतर विधी पूर्ण होणे आणि विधी करतांना ‘कलशावर गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ अन् देवता उपस्थित आहेत’, असे दृश्य दिसणे : ‘अपघाती निधन झाल्यामुळे ३.६.२०२० या दिवशी, म्हणजेच अकराव्या दिवशी ‘नारायण नागबळी’ हा विधी करायचा असतो’, अशी माहिती श्री. वझेकाकांकडून मिळाली. तो विधी करण्यात पुष्कळ अडथळे आले. त्याच दिवशी चक्रीवादळही होते; पण नंतर विधी पूर्ण झाला. नारायण नागबळी करतांना ‘कलशावर सूक्ष्मातून गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, मारुतिराया, दत्तगुरु आणि भगवान परशुराम उपस्थित आहेत’, असे दृश्य दिसले. ते पाहून मी धन्य झाले. ‘गुरुमाऊलींची कृपादृष्टी आहे’, याची मला प्रचीती आली.’
– सौ. संकल्पा संदीप तांबे (स्वयंची आई), कळंबस्ते, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. (२०.६.२०२०)
|