पैसे घेऊन विलगीकरणातून सूट देणार्या कर्मचार्यांना अटक
स्वार्थासाठी जनतेच्या जीवावर उठलेल्या शासकीय कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली तरच इतरांना जरब बसेल !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून येणार्या प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना विलगीकरणातून सूट देणार्या महापालिकेच्या एका अभियंत्यासह तीन कर्मचार्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दिनेश गावंडे असे पालिकेच्या अभियंत्याचे नाव असून त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यानंतर त्याचा राज्यात प्रसार होऊ नये, म्हणून युरोप आणि मध्य-पूर्व देशांमधून विमानाने येणार्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवले जात आहे. विलगीकरणातून सूट देण्याच्या नियमांचे पालन करतांना काही अयोग्य घडत असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेने विमानतळ प्रशासनासह संबंधिताना बारकाईने देखरेख करण्याविषयी गोपनीय पत्र दिले होते. त्यानंतर महापालिकेचे अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) दिनेश गावंडे हे विमानतळावर विदेशातून येणार्या प्रवाशांना अवैध पद्धतीने विलगीकरणातून सूट देत असल्याचे निदर्शनास आले. यासाठी त्यांना अन्य दोन कर्मचारी साहाय्य करत होते.