महादेवाचे केरवडे गावातील भ्रमणभाषच्या मनोर्याचे काम पूर्ण होण्यासाठी ग्रामस्थांची उपोषणाची चेतावणी
|
कुडाळ – तालुक्यातील महादेवाचे केरवडे पंचक्रोशी गावासाठी वर्ष २०१७ – २०१८ मध्ये भारत दूरसंचार निगमचा (बीएस्एन्एल्) मनोरा (टॉवर) संमत झाला आहे. असे असूनही ३ वर्षांमध्ये केवळ त्याच्या पायाचेच बांधकाम पूर्ण झाले आहे. मनोर्याच्या पुढील कामासाठी लागणारे विद्युत जनरेटर, पाईप, वायर इत्यादी साहित्य गावात पडून आहे. येत्या २६ जानेवारीपूर्वी हा मनोरा कार्यान्वित न झाल्यास प्रजासत्ताकदिनापासून केरवडे-नारूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर महादेवाचे केरवडे ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.
सद्यःस्थितीत महादेवाचे केरवडे गावात भ्रमणभाषला नेटवर्क नाही. ‘लँडलाईन’ सुविधाही अनियमित आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सध्या कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसर्या गावात जावे लागत आहे. त्यामुळे हा मनोरा कार्यान्वित होणे आवश्यक आहे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.