राज्यातील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या शाळा २७ जानेवारीपासून चालू होणार ! – वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण
मुंबई – राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच चालू झाले असून येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा चालू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ जानेवारी या दिवशी दिली. शाळा चालू करतांना विद्यार्थी आणि शिक्षक यांची कोविडविषयी काळजी घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. मंत्री वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग चालू करण्यासंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी दक्षता घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर रहाणार नाही, अशी निश्चिती पालकांना देते.
शिक्षणाचा ‘रोड मॅप’ सिद्ध करावा ! – मुख्यमंत्री
राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणार्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा ‘रोड मॅप’ सिद्ध करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे ‘व्हिजन २०२५’ असे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या समोर करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धापरीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शाळांमध्ये ‘फेजवाईज इंटरनेट’ सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुलांना सध्याच्या शिक्षण पद्धतीसमवेतच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का ?, या पद्धतीने शाळेची रचना करावी. शाळेची इमारत हे शिक्षणाचे स्थान कसे होईल, यासाठी पथदर्शी उपक्रम राबवावेत.
(सौजन्य : टी.व्ही. ९)