स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या भूमीवरील शैक्षणिक आरक्षण कायम रहाण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करू ! – सुधीरदादा गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली, १६ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या विश्रामबाग येथील सर्व्हे क्रमांक ३६३/२ या ६ सहस्र ६०० चौरस मीटर भूमीची भाजपचे आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी पहाणी केली. पहाणी केल्यावर आमदार श्री. गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संस्थेत संस्थेचे संचालक, शिक्षक आणि पालक प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या भूमीवरील शैक्षणिक आरक्षण उठवू देणार नाही. त्यासाठी महापालिका स्तरावर योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, तसेच राज्य स्तरावरही या विषयाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार श्री. गाडगीळ यांनी या वेळी दिले.
या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. विजय नामजोशी म्हणाले, माध्यमिक आणि क्रीडांगण आरक्षण असलेली ही भूमी शासनाने कह्यात घेतल्यानंतर कब्जेपट्टीने रीतसर संस्थेच्या नावे केली होती. त्यावर संस्थेचा सलग १३ वर्षे कब्जा आणि ताबा होता. शासनाने कोणतेही कारण न देता परत काढून घेतलेल्या सदर जागेच्या न्याय अधिकाराच्या लढ्यात आमदार श्री. सुधीर गाडगीळ आमच्या पाठीशी रहातील, असा आम्हाला विश्वास आहे.
या वेळी माजी उपमहापौर श्री. धीरज सूर्यवंशी, नगरसेवक श्री. संजय कुलकर्णी, संचालक श्री. विनायक वझे, श्री. भास्कर कुलकर्णी, श्री. जयंत चितळे, श्री. माधव कुलकर्णी, श्री. सुनील देशपांडे, तसेच अन्य उपस्थित होते.