काळानुसार आधुनिक उपकरणांनी युक्त आयुर्वेददेखील आधुनिक चिकित्सापद्धतच !
|
१. पदव्युत्तर वैद्यांना सर्जरीची मान्यता देण्यास ‘आय.एम्.ए.’कडून होत आहे विरोध !
१९ नोव्हेंबर २०२० या दिवशी ‘सी.सी.आय.एम्.’ने (सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने) एक राजपत्र-अधिसूचना काढली. या अधिसूचनेच्या माध्यमातून ‘सी.सी.आय.एम्.’ने आयुर्वेदातील पदव्युत्तर वैद्यांना ई.एन्.टी., डेंटिस्ट्री आणि सर्जरी यांच्या अधिकृत शिक्षणाची मान्यता दिली. ‘सी.सी.आय.एम्.’ने वर्ष २०१६ च्या पदव्युत्तरशी संबंधित नियमांमध्ये आंशिक पालट करून ‘जनरल सर्जरी’च्या प्रॅक्टिसची अनुमती दिली. हा पालट ‘आय.एम्.ए.’ला (‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ला) चुकीचा वाटला. याविषयी ‘आय.एम्.ए.’ने एक आपत्कालीन बैठक घेऊन सार्वजनिक पत्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भारत सरकार आणि आयुष मंत्रालय यांच्याकडे संताप व्यक्त केला. तसेच ११ डिसेंबर २०२० या दिवशी राष्ट्रव्यापी बंदची घोेषणा केली.
२. काही शेकडो वर्षांची ॲलोपॅथी चिकित्सा ‘सहस्रो वर्षांच्या आयुर्वेदाचे अध्ययन आणि अध्यापन कसे असावे ?’, हे कसे ठरवणार ?
अ. यासंदर्भात आयुष मंत्रालयाने स्पष्टीकरण देतांना म्हटले, ‘ही मान्यता केवळ ५८ शल्य उपक्रमांपर्यंत मर्यादित असून त्यांना अधिकार नसलेल्या क्षेत्रांमध्ये अधिकार देण्यात आलेले नाहीत. अभ्यासक्रमामध्ये शल्यकर्माच्या प्रशिक्षणाची व्यवस्था पूर्वीपासून विद्यमान असून आता केवळ अधिसूचना काढण्यात आली आहे.’ या स्पष्टीकरणाने ‘आय.एम्.ए.’ संतुष्ट झाली नाही. तात्पर्य, आयुर्वेदात काय शिकवले जावे आणि काय शिकवले जाऊ नये, हे ‘आय.एम्.ए.’च्या सहमतीने होईल.
आ. आयुर्वेदाची चिकित्सापद्धत सहस्रो वर्षे पुरातन असून सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. त्याचा रोग्यांना लाभ होत असल्याने त्याच्या उपयुक्ततेचे महत्त्व लोकांना पटलेले आहे. आयुर्वेदावर आधारित चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता हे दोन महत्त्वाचे ग्रंथ परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांचा काळ अनुमाने ३ सहस्र वर्षांपूर्वीचा आहे. ॲलोपॅथी चिकित्सापद्धतीचा इतिहास काही शेकडो वर्षांचा असतांना आयुर्वेदाचे अध्ययन आणि अध्यापन कसे असावे, हेही नवीन चिकित्सापद्धत ठरवणार का ? हे समजण्याच्या पलीकडे आहे.
इ. मागील २०० ते ३०० वर्षांपासून आयुर्वेद आणि अन्य आयुष पद्धतींना राजाश्रय मिळाला नाही. सध्याचे सरकार आयुष पद्धतीला चांगल्या प्रकारे संरक्षण देत असून तिला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा मार्ग प्राचीन चिकित्सा-सिद्धांत यांच्यानुसार नियोजित आणि नियंत्रित आहे. आयुर्वेदाने त्याच्या सिद्धांतानुसार आणि शल्यचिकित्सा पद्धतीने त्याच्या सिद्धांतानुसार कार्य करणे अपेक्षित आहे. अविष्कृत (आताच्या काळात शोधून काढलेले) वैज्ञानिक सुविधांचा उपयोग करण्याचा अधिकार सर्वांना समान आहे.
ई. काळानुसार आधुनिक उपकरणांनी युक्त आयुर्वेददेखील नवीन स्वरूपात आधुनिक चिकित्सापद्धतच आहे. जे चिकित्सक नवीन उपकरणांच्या साहाय्याने प्राचीन आयुर्वेदीय सिद्धांतानुसार चिकित्सा करत असतील, तर तेही आधुनिक चिकित्सकच आहेत. आयुर्वेदाला युगानुरूप प्रस्तुत करण्याची अनुभूती आणि प्रेरणा ६ व्या शतकातील आयुर्वेदतज्ञ आचार्य वाग्भट यांनी दिली. अर्थात् आयुर्वेदाला आधुनिक चिकित्सापद्धत म्हणणे चुकीचे नाही.
३. खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी राज्यसभेत आयुर्वेदाचे समर्थन करणे
अ. राज्यसभेतील भाजपचे खासदार श्री. सुधांशु त्रिवेदी यांनी २० सप्टेंबर २०२० या दिवशी राज्यसभेत आयुर्वेदाच्या श्रेष्ठतेविषयी अनेक पुरावे सादर केले. ते म्हणाले, ‘‘आयुर्वेदाचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महर्षि सुश्रुत यांची शल्यचिकित्सा उच्चस्तरीय होती. सुश्रुतसंहितेमध्ये १८० अध्याय आहेत. त्यात १ सहस्र ११० रोगांच्या १२० शल्यचिकित्सेसंबंधीच्या उपकरणांचा, तसेच अनुमाने ६५० औषधींचा उल्लेख आहे आणि यात ३०० हून अधिक पद्धती सांगण्यात आल्या आहेत.’’
आ. खासदार श्री. त्रिवेदी हे आयुर्वेदाचे अध्यापक किंवा चिकित्सक नाहीत. ते चिंतक आणि ओजस्वी वक्ते आहेत. त्यांनी आयुर्वेदाविषयीची माहिती ज्या पुराव्यांसह सभागृहात दिली, ते भारतीय प्राचीन विज्ञानाच्या श्रेष्ठत्वाचे द्योतक आहे.
इ. या वेळी खासदार श्री. त्रिवेदी पुढे म्हणाले, ‘‘ब्रिटिशांच्या शासनकाळात जॉन मार्शल हे पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे (आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे) प्रमुख होते. मार्शल यांनी सांगितल्यानुसार भारतीय शल्यचिकित्सा अतिशय प्राचीन आहे. वर्ष १७९४ मध्ये ब्रिटीश नियतकालिक ‘द जंटलमन’मध्ये प्लािस्टक सर्जरीशी संबंधित प्रकाशित एका शोधप्रबंधाचा उल्लेख करतांना मार्शल यांनी ‘वर्ष १७९३ मध्ये पुणे येथे कुंभार समाजातील २ सामान्य व्यक्तींनी नाकाची प्लास्टिक सर्जरी यशस्वीपणे केली’, असे सांगितले होते. या घटनेचा अभिमानास्पद उल्लेख या शोधपत्रामध्ये आहे.’’
४. महर्षि सुश्रुत यांनी सांगितलेल्या विधीनुसार एका अफगाणी महिलेच्या नाकाची यशस्वीरित्या प्लॉस्टिक सर्जरी करण्यात येणे
अनुमाने २ वर्षांपूर्वी दैनिक ‘भास्कर’मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्याचे शीर्षक होते, ‘सब तरीके फेल, सुश्रुत की २ सहस्र ५०० साल पुरानी टेक्निक से बनी नाक ।’ (सर्व पद्धती अयशस्वी, सुश्रुतच्या २ सहस्र ५०० वर्षे जुन्या तंत्राने नाक व्यवथित झाले.) या वृत्तानुसार बंदुकीची गोळी लागून शम्सा या अफगाणी महिलेचे नाक तुटले होते. तिने नाकावर अनेक ठिकाणी जाऊन प्लास्टिक सर्जरी केली; परंतु तिला यश आले नव्हते. त्यामुळे तिने देहलीतील ‘के.ए.एस्. मेडिकल सेंटर अँड मेडस्पा हॉस्पिटल’ येथे यशस्वी प्लास्टिक सर्जरी करवून घेतली. महर्षि सुश्रुत यांनी सांगितलेल्या विधीनुसार ही प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. त्यामुळे आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) हे यश मिळाले, याचा त्यांनी अभिमानाने स्वीकार केला. दैनिक ‘भास्कर’नेही ही घटना प्राधान्याने छापली. त्यामुळे त्यांचेही कौतुक करायला पाहिजे.
प्लास्टिक सर्जरी करणारे डॉ. अजय कश्यप यांनी सांगितले, ‘‘शम्सा या महिलेची केस अतिशय जटील होती. सर्व प्रकारच्या आधुनिक पद्धती अयशस्वी झाल्या होत्या. नाक आणि कान यांची प्लास्टिक सर्जरी करण्याचे सर्वांत अचूक तंत्र सुश्रुतसंहितेमध्येच दिले होते. आम्ही सुश्रुतमधील तंत्राच्या आधारे नाक बनवण्यासाठी गालाची त्वचा घेतली आणि त्यात आम्हाला यश मिळाले.’’
प्राचीन भारतीय चिकित्सापद्धतीच्या कार्यचिकित्सेचा सिद्धांत आणि शल्यचिकित्सेचा सिद्धांत, क्रिया अन् विधी यांचे अनुकरण केले पाहिजे, यश मिळवले पाहिजे आणि त्यासाठी अभिमानही बाळगला पाहिजे. विरोध नव्हे, तर आदर केला पाहिजे. यासाठी वरील उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे.
५. प्राचीन भारतीय शल्यचिकित्सेचे श्रेष्ठत्व आधुनिक वैद्यांनी मान्य करायला हवे !
अ. ॲलोपॅथी चिकित्सापद्धतीच्या अनेक तज्ञ शल्यचिकित्सकांनी हे मान्य केले की, आयुर्वेदाच्या अनेक शल्यक्रियांचे अनुकरण सध्याचे शल्यचिकित्सक करत आहेत. अनेक शल्यचिकित्सक प्राचीन तंत्र मनातून मान्य करत आहेत; परंतु स्पष्ट सांगण्यात त्यांना संकोच वाटत आहे.
आ. महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांचे अनेक चिकित्सा सिद्धांत आजही अत्यंत उपयुक्त आहेत. नवीन उपकरणांच्या साहाय्याने सर्व प्राचीन सिद्धांतांचा उपयोग करून चिकित्सा क्षेत्रात नवीन आयाम स्थापित केले पाहिजे. जे चिकित्सक अभिमानाने या सिद्धांतांचे अनुकरण करून कृतज्ञता व्यक्त करतात, ते अभिनंदनीय असून आदरणीय आहेत.
इ. वरील विचार माझे नसून एका नियतकालिकाचे आहेत. महर्षि सुश्रुत यांच्याविषयी एका विद्वान लोकप्रतिनिधीचे विचार वाचून कोणत्याही आयुर्वेदतज्ञाला आनंद झाल्यावाचून रहाणार नाही. प्राचीन भारतीय शल्यचिकित्सेचे सिद्धांत अद्भुत आहेत. त्यांना प्रायोगिक स्वरूपात प्रशिक्षित करणारे भगवान धन्वन्तरि पूजनीय आहेत.
– प्रा. वैद्य बनवारीलाल गौड, माजी कुलपती, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राजस्थान आयुर्वेद विश्वविद्यालय, जोधपूर.
(संदर्भ : आयुर्वेद महासंमेलन पत्रिका, डिसेंबर २०२०)