अधिकार्यांच्या स्थानांतराचा डॉ. लहाने यांनी घेतलेला निर्णय ‘मॅट’कडून रहित
मुंबई – कोरोनाकाळात कामावर अनुपस्थित राहिल्याने जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी स्थानांतर केले होते. त्यांचा हा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा(‘मॅट’)कडून रहित करण्यात आला आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांचा ५ ऑगस्टचा आदेश हा मनमानी स्वरूपाचा आहे. हा आदेश अधिकारांचा दुरुपयोग करून काढलेला असून शिक्षेच्या स्वरूपातील असल्याने डॉ. आनंद यांच्या ३२ वर्षांच्या सेवेवर एकप्रकारे डाग लावणाराही आहे’, असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिला आहे. डॉ. आनंद यांना १६ जानेवारीपर्यंत पुन्हा मूळ पदावर नियुक्त करण्याचा आदेशही न्या. ए.पी. कुर्हेकर यांनी दिला आहे.
डॉ. आनंद यांच्या विभागातून दोन महिलांना प्रसूतीनंतर रुग्णालयातून सोडतांना ठरलेल्या प्रक्रियेचे पालन झाले नाही. रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांचा अहवाल ‘कोरोना पॉझिटिव्ह’ आला. परिणामी त्यांना पुन्हा संपर्क साधून सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोनाच्या उपचारांसाठी भरती करून घ्यावे लागले. या हलगर्जीपणाविषयी तीन तज्ञांची चौकशी समिती नेमली होती.