‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !
‘हिंदु राष्ट्राचा मावळा’ बनवण्याची प्रक्रिया करणार्या ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे महत्त्व आणि त्याचा प्रशिक्षणार्थींना झालेला लाभ !
१. सध्याच्या कराटेच्या प्रशिक्षणाचा उपयोग प्रशिक्षणार्थींकडून राष्ट्र आणि धर्म यांसाठी होतांना क्वचित्च आढळणे
‘सध्या समाजामध्ये कराटेच्या प्रशिक्षणाचे अनेक वर्ग चालतात. कराटे शिकणार्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ‘पांढरा, पिवळा, नारिंगी, हिरवा, निळा, तपकिरी आणि काळा’, असे विविध ‘बेल्ट’ (पट्टे) दिले जातात; परंतु ‘त्यांना प्रत्यक्षात घडणार्या घटनांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करण्यास शिकवले जात नाही’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे कराटे प्रशिक्षण कितीही चांगले असले, तरीही चार भिंतींच्या बाहेर त्या विद्यार्थ्यांचे कौशल्य, शौर्य आणि त्यांनी घेतलेले प्रशिक्षण यांचा राष्ट्र अन् धर्म यांसाठी उपयोग होतांना दिसून येत नाही.
२. ‘हिंदु जनजागृती समिती’च्या माध्यमातून दिल्या जाणार्या विनामूल्य ‘स्वरक्षण प्रशिक्षणा’मुळे युवा पिढी अल्पावधीतच सर्वांगाने सक्षम बनणे
‘हिंदु जनजागृती समिती’च्या माध्यमातून युवा पिढीला विनामूल्य ‘स्वरक्षण प्रशिक्षण’ शिकवले जाते. ‘या वर्गांच्या माध्यमातून युवा पिढीला अल्प कालावधीत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनवण्याची गतीही अधिक आहे’, असे अनेक धर्मप्रेमींनी सांगितलेल्या अनुभवावरून माझ्या लक्षात आले.
३. हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्गा’चा लाभ
‘हिंदु जनजागृती समिती’च्या माध्यमातून सध्या ७ दिवसांचे ऑनलाईन ‘शौर्यजागृती वर्ग’ (क्रॅश कोर्स) आणि आणि अन्य वेळी प्रत्यक्षात ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या ७ दिवसांच्या वर्गांमध्ये मुला-मुलींमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण पालट आढळून आले. या प्रशिक्षणार्थींनी त्यांचे अनुभव कथन करतांना त्यांनी पुढीलप्रमाणे पालट आणि लाभ झाल्याचे सांगितले.
३ अ. शारीरिक
१. प्रशिक्षणार्थींना एक ते दीड घंटा प्रशिक्षण करूनही थकवा न जाणवता अधिक उत्साही वाटत होते.
२. त्यांना नियमित व्यायामाचा किंवा अन्य शारीरिक परिश्रम करण्याचा सराव नसूनही स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात आल्यावर त्यांना त्रास झाला नाही.
३. त्यांना त्यांची शारीरिक क्षमता अल्प कालावधीमध्ये वाढल्याचे जाणवले.
४. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात आल्यामुळे काहींचे शारीरिक दुखणे थोडे न्यून होऊन त्यांना चांगला लाभ झाला.
३ आ. मानसिक
१. स्वरक्षण प्रशिक्षणाने सर्वांचा आत्मविश्वास वाढून भीती न्यून झाल्याचे जाणवले.
२. सर्वांमध्ये ‘अन्यायाविरुद्ध प्रतिकार करू शकतो’, ही भावना निर्माण झाली.
३. स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे विविध आघात असलेले प्रसंग अन् घटना सांगितल्या जातात. त्यातून ‘समाजात घडणार्या अशा प्रसंगांकडे कशा दृष्टीने पहायला पाहिजे ?’, हे त्यांना शिकता आणि अनुभवता आले.
४. मुलींमध्ये अधिक प्रमाणात पालट दिसून आले. ‘आजची युवती शोषित आणि अत्याचार सहन करणारी नसून ती ‘रणरागिणी’ आहे. ती लढून प्रतिकारही करू शकते’, ही भावना या ७ दिवसांत प्रत्येक मुलीमध्ये निर्माण झाली.
५. प्रशिक्षणार्थींमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रेम, जागरूकता आणि आत्मीयता वाढल्याचे दिसून आले.
६. वर्गांमध्ये इतिहासातील शौर्याचे विविध प्रसंग सांगितल्यावर प्रशिक्षणार्थींची न्यून झालेली शारीरिक ऊर्जा पुन्हा जागृत होऊन मन शारीरिक प्रशिक्षण करण्यासाठी सज्ज झाले.
७. या प्रशिक्षणवर्गांच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींचा हिंदु राष्ट्राच्या कार्यातील सहभाग वाढला. ‘आपण घेतलेले प्रशिक्षण स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते इतरांनाही शिकवायचे आहे’, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि अनेक नवीन धर्मप्रेमी ‘चांगले प्रशिक्षक’ म्हणून घडत असल्याचे जाणवले.
३ इ. आध्यात्मिक
३ इ १. सर्वांना भगवंताचे अस्तित्व, शक्ती आणि ईश्वरी सामर्थ्य अनुभवता आले.
३ इ २. नामजपातील शक्ती आणि आनंद अनुभवणे : आरंभीच्या २ – ३ दिवसांमध्ये वर्गांमध्ये कुलदेवता आणि श्री दत्तगुरु यांचा नामजप सांगितला जातो. सर्व धर्मप्रेमींनी नामजप करायला लगेच आरंभ करून त्यातील शक्ती आणि आनंद अनुभवला. नामजप केल्यामुळे होणारे लाभ अन् मनाच्या स्थितीमध्ये होणारे पालट प्रत्यक्ष अनुभवल्याने त्यांना पुष्कळ आनंद मिळाला.
३ इ ३. धर्माचरणाच्या कृतींचा लाभ अनुभवणे : वर्गात प्रशिक्षणार्थींना ‘मुलांनी टिळा लावणे, मुलींनी कुंकू लावणे, हात जोडून नमस्कार करणे, ‘हॅलो’ न म्हणता एकमेकांना ‘जय श्रीराम’ किंवा ‘नमस्कार’ म्हणणे’, अशा धर्माचरणाच्या कृती सांगितल्यावर त्यांनी त्या आचरणात आणण्यास आरंभ केला. स्वतः कृती करून इतरांनाही सांगितल्या. या छोट्या छोट्या कृतींच्या माध्यमातूनही त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या होणारा धर्माचरणाचा लाभ लक्षात आला.
३ इ ४. काही जणांमध्ये ईश्वराप्रतीचा भाव वाढला.
३ इ ५. विविध भावप्रयोगांमुळे अनुसंधानात रहाता येणे : प्रशिक्षणार्थींचे ईश्वराशी अनुसंधान रहाण्यासाठी वर्गांमध्ये विविध भावप्रयोग घेतले जातात, उदा. ‘साक्षात् सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीकृष्ण विराट रूपामध्ये आपल्यासमोर उभा आहे आणि आपण त्याच्या समक्ष अर्जुनाप्रमाणे स्वरक्षण प्रशिक्षण करत आहोत.’ ‘आदिशक्ती श्री दुर्गादेवी आपल्यासमोर उभी आहे आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊन अन् तिला संपूर्णपणे शरण जाऊन आपण स्वरक्षण प्रशिक्षण शिकत आहोत.’ अशा प्रकारचे विविध भावप्रयोग या वर्गांमध्ये घेतले जातात. त्याचाही सर्वांना पुष्कळ लाभ झाला.
३ इ ६. प्रार्थना आणि कृतज्ञता यांमुळे अहं न्यून होण्यास साहाय्य होणे : या वर्गाच्या आरंभी धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि आदिशक्ती श्री दुर्गादवी यांना प्रार्थना करून प्रशिक्षणवर्ग चालू होतो आणि वर्ग संपल्यावर त्यांनीच हे स्वरक्षण प्रशिक्षण करवून घेतल्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली जाते. वर्गात अधूनमधून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केल्या जातात. यामुळे ‘मी’हे शारीरिक प्रशिक्षण केले, ‘मी’ हे सर्व प्रकार चांगले केले, ‘मला जमले’, असे अहंयुक्त विचार न्यून होण्यास साहाय्य होते.
४. ‘हिंदु जनजागृती समिती’चा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग म्हणजे शौर्याच्या उपासनेचे सामर्थ्य अनुभवण्याचे एक केंद्रच असणे
अशा प्रकारे ‘हिंदु जनजागृती समिती’चे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग म्हणजे ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ‘हिंदु राष्ट्राचा मावळा’ बनवण्याची प्रक्रिया करणारे केंद्र असून ती शौर्याची उपासना आहे. हे वर्ग या उपासनेचे सामर्थ्य अनुभवण्याचे एक केंद्रच आहे’, असे मला वाटते. साक्षात् श्री गुरूंचा संकल्प आणि भगवान श्रीकृष्ण अन् संत यांचा आशीर्वाद असलेले स्वरक्षण प्रशिक्षण सर्वांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला मिळत आहे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी आवश्यक असलेली शौर्याची साधना समाजाकडून करवून घेण्याची संधी आम्हाला लाभली असून ‘भगवंत आणि श्री गुरु यांच्या कृपेने हे कार्य होत आहे’, हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे. यासाठी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि कृपाळू गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२३.११.२०२०)
हिंदु शौर्यविहीन झाल्यामुळेच हिंदुद्रोह्यांनी त्यांच्यावर नित्य आघात करणे !गेल्या काही शतकांपासून हिंदूंना तथाकथित अहिंसेचा असा धडा शिकवला गेला आहे की, आजपर्यंत हिंदू आपल्यावर होणार्या आक्रमणांचा प्रतिकार क्षात्रवृत्तीने करू शकत नाही. काश्मीरपासून केरळपर्यंत हिंदूंवर किंवा हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर सतत होणारी आक्रमणे आणि आघात यावरून हेच सिद्ध होत आहे. जी अंशमात्र क्षात्रवृत्ती शेष होती, ती वर्ष १८७८ च्या ‘शस्त्र एक्ट (आर्म एक्ट)’ आणि मेकॉलेच्या पाश्चात्त्य शिक्षणप्रणालीने नष्ट केली. आता तर हिंदू एवढा मृतवत झाला आहे की, त्याला क्षात्रवृत्ती शब्दही ज्ञात (ठाऊक)नाही; त्यासाठी आपल्याला आज सामान्य हिंदूंच्या घरात संरक्षणासाठी एक लाठी सुद्धा मिळत नाही. त्यामुळेच आज अहिंदूंद्वारा होणार्या आघातांचा प्रतिकार, सामूहिक रूपाने केल्यावर भयभीत होतात. हिंदूंचे अतिशांतीप्रिय किंवा अतिसहिष्णु असणेच त्याच्या पतनाचे कारण आहे. (संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’ वर्ष : २, अंक ११, २२.७.२०२०) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |