नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर झालेला परिणाम आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

दृष्ट काढण्यासंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांवर सतत आक्रमण करतात. यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांना विविध प्रकारचे शारीरिक त्रास होतात. त्यांना होणारे त्रास दूर व्हावे, यासाठी २१.७.२०१९ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची नारळाने दृष्ट काढली. ‘नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी नारळाची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

नारळाने दृष्ट कशी काढतात, याचे प्रातिनिधीक चित्र

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – नारळाने दृष्ट काढल्यानंतर नारळातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : आरंभी (दृष्ट काढण्यापूर्वी) नारळामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा होती. नारळाने परात्पर गुरु डॉक्टरांची दृष्ट काढल्यानंतर त्या नारळातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्या, हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

प्रा. सुहास जगताप

२. निष्कर्ष

दृष्ट काढल्यानंतर नारळामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. याचे कारण हे की, दृष्ट लागलेल्या व्यक्तीभोवती असलेली त्रासदायक स्पंदने नारळामध्ये खेचली गेली.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. दृष्ट काढल्याने व्यक्तीचे स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) दूर होणे : व्यक्तीला दृष्ट लागल्याने तिच्याभोवती रज-तमात्मक आवरण (त्रासदायक स्पंदने) निर्माण होते. त्यामुळे तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. ज्या वेळी व्यक्तीचा स्थूलदेह रज-तमात्मक स्पंदनांनी भारित होतो, त्या वेळी ती शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. शारीरिक व्याधींमध्ये तीव्र डोकेदुखी, कान ठणकणे, डोळे दुखणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, हाता-पायांना मुंग्या येणे, छातीत धडधडणे, हात-पाय गार पडून गळून जाणे इत्यादी त्रास होतात. दृष्ट काढल्याने तिच्या स्थूलदेह, मनोदेह आणि सूक्ष्मदेह यांवर आलेले रज-तमात्मक आवरण दूर होते. यामुळे व्यक्तीला होणारा त्रास उणावतो किंवा नाहीसा होतो.

३ आ. दृष्ट काढल्यानंतर नारळातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : ‘नारळामध्ये चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लहरी खेचल्या जातात. नारळात रज-तमात्मक लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होऊन त्यांचे नारळाच्या सात्त्विकतेमुळे आतल्याआत बर्‍याचशा प्रमाणात विघटन होते. दृष्ट काढण्याची नारळाची क्षमता इतर घटकांपेक्षा अधिक असल्याने व्यक्तीच्या सूक्ष्मदेहापासून त्रासदायक शक्तीचे (त्रासदायक स्पंदनांचे) आवरण खेचण्यात नारळ अग्रेसर मानला जातो. नारळ सर्वसमावेशक असल्याने तो कोणत्याही प्रकारच्या दृष्टीवर किंवा करणीवर उपयोगी पडतो.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘मीठ-मोहरी, नारळ, तुरटी आदींनी दृष्ट कशी काढावी?’) परात्पर गुरु डॉक्टरांची नारळाने दृष्ट काढल्याने त्यांच्या भोवतीची त्रासदायक स्पंदने नारळामध्ये खेचली गेली. त्यामुळे नारळातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्याच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली.’

– प्रा. सुहास जगताप, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक