मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणार्या महिलेच्या अधिवक्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या
मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध तक्रार करणार्या महिलेचे अधिवक्ता रमेश त्रिपाठी यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. या प्रकरणी मुंबई, नवी मुंबई येथील पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणात युक्तीवाद करू नये यासाठी निनावी धमक्या येत आहेत. त्यामुळे आपणास पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही त्रिपाठी यांनी केली आहे.
पोलिसांनी अद्याप मुंडे यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद केला नाही. मुंडे यांच्या मेव्हण्याने नोव्हेंबर मासात ही महिला, तिची बहीण (मुंडे यांची दुसरी पत्नी) आणि त्यांच्या भावाविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर त्या वेळी कारवाई का केली नाही ?, याचा शोध घेतला जात आहे.
‘एका कारागृहात नसतील तितक्या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत’, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार नीलेश राणे यांनी मुंडे प्रकरणावरून केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘नीलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. |