जगातील एकमेव अद्वितीय स्थान असलेला रामनाथी, गोवा येथील चैतन्यमय सनातन आश्रम !
रामनाथी, गोवा येथील चैतन्यमय सनातन आश्रम म्हणजे चैतन्ययुक्त वैकुंठलोकच !
१. आश्रमातील साधकांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. सहजस्थितीत राहून निरपेक्षतेने आणि सर्वांशी आत्मीयतेने वागणारे आश्रमातील साधक ! : ‘आश्रमातील सर्व साधकांचे एकमेकांशी वागणे मोकळेपणाने असते. ते सगळ्यांशी नम्रतेने बोलतात. ते सहजस्थितीत राहून निरपेक्षतेने आणि आत्मीयतेने वागतात. त्यांच्यातील प्रेमभाव बघून मला माझ्या वागण्यातील काही त्रुटी लक्षात आल्या. या साधकांमध्ये बर्याच प्रमाणात ईश्वरी गुण आढळून येतात.
१ आ. भावपूर्ण आणि एकाग्रतेने सेवा करणे : सर्व साधक आनंदाने, निस्वार्थ भावाने आणि निरपेक्षतेने सतत सेवेत मग्न असतात. ते भावपूर्ण आणि एकाग्रतेने सेवा करतात. ते एकमेकांची पुष्कळ काळजी घेतात.
१ इ. व्यापकत्व असणे : त्यांच्यामध्ये व्यापकत्व आहे. एरव्ही घरात ४ – ५ लोकही इतक्या शांततेने आणि सामंजस्याने एकत्र राहू शकत नाहीत; परंतु येथे मात्र अनेक साधक गुण्यागोविंदाने सहज रहातात.
१ ई. ‘एकमेकांच्या चुका सांगून त्यांना साहाय्य करणे : साधक दिवसभर झालेल्या चुका सारणीत लिहून त्या चुकांचे चिंतन करतात आणि ‘पुन्हा तशा चुका होऊ नयेत’, याची काळजी घेतात. ते सेवा करतांना त्यांच्या झालेल्या चुका एकमेकांना सांगून त्या स्वीकारतात आणि त्या सुधारण्यासाठी एकमेकांना साहाय्यही करतात. ‘चुका निदर्शनास आणणे आणि त्या स्वीकारून पुन्हा न होण्यासाठी उपाय करणे ही साधनाच आहे’, अशी शिकवण गुरुमाऊलींनी साधकांना दिली आहे.
१ उ. काटकसरीपणा : प्रत्येक साधक काटकसरीने वागून गुरुधनाची हानी होऊ नये, यासाठी प्रयत्नरत असतो. साधक वेळच्या वेळी दिवे आणि पंखे बंद करणे, विजेचा अनावश्यक उपयोग टाळणे, प्रत्येक वस्तू आवश्यक तेवढीच उपयोगात आणणे इत्यादी गोष्टींचे पालन करतात.
१ ऊ. प्रामाणिकपणा : आश्रमात कुणी कुणाच्या वस्तूला विचारल्याविना हातसुद्धा लावत नाहीत. आपली एखादी वस्तू कुठे पडली असेल किंवा विसरून राहून गेली असेल, तर दुसर्या दिवशीही ती तिथेच सापडते. (हरवलेली वस्तू कुणाला मिळाल्यास त्यासंबंधीची सूचना फलकावर लावलेली असते.) इतका प्रामाणिकपणा साधकांमध्ये आहे. याउलट बाहेरच्या वातावरणात एखाद्या ठिकाणी आपली वस्तू हरवली, तर ती परत मिळण्याची मुळीच शाश्वती नसते.
थोडक्यात, आश्रमातील साधकांमध्ये प्रीती, सहजता, निरपेक्षता, प्रामाणिकता, व्यापकता, निस्वार्थ भावाने सेवा करणे, भावपूर्ण आणि परिपूर्ण कृती करणे, काटकसर, प्रसिद्धीपराङ्गमुखता, असे अनेक ईश्वरी गुण पहायला मिळतात.
२. सेवांचे नियोजन आणि कार्यपद्धतींचे पालन
२ अ. उत्तम नियोजन आणि वेळेचे महत्त्व : आश्रमात सेवांचे उत्तम नियोजन असल्याने कुणालाही सेवेचा ताण येत नाही. साधकांना वेळेचे पुष्कळ महत्त्व असल्याने ते त्यांचा वेळ वाया घालवत नाहीत.
२ आ. नियमित आश्रम स्वच्छता आणि नामजप करत सेवा केल्याने आश्रमातील वातावरण चैतन्यमय होणे : आश्रमात प्रतिदिन स्वच्छतेची सेवा केली जाते. साधक आश्रम पुष्कळ स्वच्छ ठेवतात. साधक आश्रमातील प्रत्येक सेवा नामजप करतच करतात. त्यामुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय झालेले आहे.
२ इ. कार्यपद्धतींचे पालन करून निष्काम भावाने साधना केल्याने साधक सतत आनंदी असणे : आश्रमातील साधकांना सेवा करण्यासाठी काही कार्यपद्धती घालून दिलेल्या आहेत. या कार्यपद्धतींचे पालन करून साधक उत्तम प्रकारे सेवा करतात. प्रत्येक साधकाला त्याच्या क्षमतेनुसारच सेवा दिली जाते. या पद्धतींचे पालन करत साधक ‘ईश्वरप्राप्ती करणे’ आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हे दोन उद्देश समोर ठेवून निरंतर निष्काम भावाने साधना करतात आणि सतत आनंदी असतात.
२ ई. आश्रमात प्रतिदिन अनेक साधकांसाठी अल्पाहार आणि महाप्रसाद सिद्ध होत असूनही सर्व काही नियोजनबद्ध अन् शांतपणे चालू असणे : आश्रमात प्रतिदिन शेकडो साधक महाप्रसाद ग्रहण करतात. इतक्या साधकांसाठी सकाळी अल्पाहार आणि चहा बनवण्याची सेवा केली जाते. सकाळी आणि रात्रीसाठी महाप्रसाद सिद्ध करण्याची सेवा असते. या सेवा इतक्या शांतपणे केल्या जातात की, कुठेही काही गडबड किंवा गोंधळ दिसून येत नाही. सर्व सेवा नियोजनाप्रमाणे चालू असतात. आपल्या घरी ४-५ पाहुणे आले किंवा आपण बाहेर कुणाकडे पाहुणे म्हणून गेलो, तर आपली किती त्रेधातिरपीट आणि धावपळ होते ! किती घाईगडबड आणि ताण असतो; परंतु येथे सर्व काही शांततेने चालू असते.
३. वक्तशीरपणा
आश्रमात वेळेचे काटेकोरपणे पालन केले जाते. आश्रमात भावसत्संग, व्यष्टी आढावा, कार्यशाळा, तसेच यज्ञ, याग आणि श्राद्धविधी यांसारखे धार्मिक कार्यक्रमही नियोजित वेळेतच चालू होतात आणि वेळेतच समाप्त होतात. कधीच विलंब होत नाही. याउलट बाहेर आपल्याला वेळेचे इतके महत्व दिसून येत नाही. बाहेर कोणतेही कार्यक्रम वेळेवर चालू किंवा समाप्त होण्याची कधीच निश्चिती नसते.
४. प्रत्येक क्षणी साधकांचा विचार असणे
४ अ. बालसाधकांची घेतलेली काळजी : आश्रमात लहान बाळे आणि मुले यांना घेऊन आलेल्या मातांना आपल्या बाळांच्या सुरक्षिततेविषयी जराही ताण नसतो. आश्रमात खेळत असलेल्या मुलांकडे प्रत्येक साधकाचे लक्ष असते आणि मुले आनंदाने खेळत असतात. त्यामुळे बाळांच्या माता निश्चिंत असतात.
४ आ. वयस्कर आणि रुग्णाईत साधकांची पुष्कळ काळजी घेतांना पाहिल्यावर ‘गुरुमाऊलीने किती भरभरून दिले आहे’, याची जाणीव होऊन मन भरून येणे : आश्रमात वयस्कर साधकांची पुष्कळ काळजी घेतात. त्यांना सेवा देतांना त्यांच्या वयाचा विचार केला जातो. त्यांना जमेल तेवढीच सेवा देतात. आश्रमात रुणाईत साधकांचीसुद्धा पुष्कळ काळजी घेतली जाते. त्यांची प्रकृती उत्तम होईपर्यंत सतत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून साधक त्यांना आवश्यक ते सर्व साहाय्य करतात. हे सर्व पाहिल्यावर ‘आपण काहीच करत नसूनही गुरुमाऊलीने आम्हाला किती भरभरून दिले आहे’, या विचाराने कृतज्ञतेने मन भरून येते. ‘आपल्याकडून गुरुमाऊलींच्या आज्ञेचे पालनही नीट होऊ शकत नाही’, हा विचार येऊन माझा अपराधीपणा वाढून शरणागतभाव जागृत होतो.
५. गुरुमाऊलीचे प्रेम
५ अ. प्रत्येक साधकावर निरपेक्ष प्रेम करणारी गुरुमाऊली ! : गुरुमाऊलीच्या दृष्टीकोनातून येथील प्रत्येक साधक, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मोठ्या हुद्यावर असो, महत्त्वपूर्ण असो किंवा नसो, सारखाच महत्त्वपूर्ण आहे. गुरुमाऊलीचे प्रत्येक साधकावर निरपेक्ष प्रेम आहे.
५ आ. केवळ आश्रमातील साधकांचेच नव्हे, तर बाहेरून आश्रमदर्शनासाठी येणारे लोक, साधकांचे नातेवाईक, विदेशी साधक आणि अतिथी इत्यादींचे भोजन, निवास इत्यादी गोष्टींचे नियोजन अन् आदरातिथ्य उत्तम प्रकारे करणे : गुरुमाऊलीचे सर्व साधकांवर सारखेच लक्ष आहे. तिला प्रत्येक साधकाची काळजी आहे. इतकेच नव्हे तर साधकाच्या कुटुंबियांवरही तिचे अपार प्रेम आहे. त्यांचे आश्रमातील खाणे-पिणे, निवास, आश्रम-दर्शन इत्यादी सर्वच गोष्टींचे उत्तम नियोजन केलेले आहे. त्यात कुठल्याच गोष्टीची उणीव नसते. आश्रम बघण्यासाठी बाहेरून येणारे लोक, साधकांचे नातेवाईक, तसेच आश्रमास भेट देणारे सर्व स्तरांतील लोक आणि देश-विदेशातून येणारे साधक अथवा महत्त्वपूर्ण व्यक्ती कुणीही असो, त्यांचे भोजन, निवास इत्यादी गोष्टींचे नियोजन आणि आदरातिथ्य अशा प्रकारे केले जाते की, कुणाचीही जराही गैरसोय होऊ नये. त्यांच्या सुविधांची कटाक्षाने काळजी घेतली जाते.
५ इ. प्रत्येक साधकाची सेवा आणि साधना उत्तम रितीने करवून घेणारी गुरुमाऊली ! : प्रत्येक साधकाकडून सेवा आणि साधना उत्तम रितीने व्हावी; म्हणून गुरुमाऊलीने पुष्कळ कष्ट घेतले आहेत. आश्रमात सर्व साधकांसाठी आधुनिक पद्धतीच्या सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
५ ई. साधकांना साधना करण्यासाठी भरभरून देणारी गुरुमाऊली ! : समाजात आपण एखाद्याला विचारले, ‘आपण काय साधना करता ?’ तर तो मोठ्या आविर्भावात सांगतो, ‘मी अमुक स्तोत्राचे इतक्या वेळा पठण करतो. इतक्या माळा नामजप करतो’; परंतु गुरुमाऊलीने साधकांमध्ये साधनेचे असे बीज पेरले आहे की, कितीही संख्येने नामजप किंवा साधना करूनही साधकाला वाटते, ‘गुरुमाऊली आपल्याला किती भरभरून देत आहे ! त्या मानाने आपणच साधना करण्यात न्यून पडतो.’
गुरुमाऊलीने सर्व साधकांना गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेचे महत्त्व सांगितले आहे. तिने मोक्षप्राप्तीच्या आड येणारे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारी अन् कुठेही न शिकवली जाणारी अशी प्रक्रिया शिकवून तिचे महत्त्व साधकांवर बिंबवले आहे.
५ उ. ‘जीवनात आनंदप्राप्ती कशी करावी ?’, हे स्वतःच्या आचरणातून शिकवणारी आणि उत्तम साधक घडवणारी गुरुमाऊली ! : एका कवितेतील ‘जगी हा वेड्यांचा पसारा माजला सारा’ या ओळीत सांगितल्याप्रमाणे जगात प्रत्येक जण जीवनात सुखप्राप्तीसाठी इतका धडपडत असतो की, तो प्रत्येक गोष्टीतून सुख मिळवण्याकरता अगदी वेडा झालेला असतो. कुणी शिक्षणासाठी, कुणी लग्नासाठी, कुणी नोकरीसाठी तर कुणी संपत्तीसाठी वेडा झालेला असतो. अशा अनेक अशाश्वत गोष्टींच्या मागे धावून तो त्यातच सुख आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. याउलट गुरुमाऊलीने याच्याही पुढे जाऊन ‘जीवनात खरा आनंद कसा प्राप्त करावा ?’, हे स्वतःच्या आचरणातून साधकांना शिकवले. ‘आधी केले मग सांगितले’, या न्यायाने जीवनात प्रत्येक गोष्ट स्वतः आचरणात आणली आणि मग साधकांना शिकवली. त्यामुळेच सनातनच्या साधकांच्या मनावर सर्व ईश्वरी गुण कोरले जाऊन उत्तम साधक सिद्ध झाले.
५ ऊ. स्वतःच्या कृतीतून साधकांवर संस्कार करणार्या गुरुमाऊलीमुळे प्रत्येक साधक आनंदी असणे : आमच्या गुरुमाऊलीने सर्व साधकांना ‘ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप’ या ओळीप्रमाणे शिकवण दिली. ‘जो ज्या भावाने सेवा करील; जेवढी अचूक, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करील, ‘दिसेल ते कर्तव्य’ या दृष्टीने अर्जुनभावाची साधना करील, त्याच्या साधनेची फलनिष्पत्ती तितकी अधिक होईल आणि त्याची उन्नती जलद होईल’, असे संस्कार गुरुमाऊलीने स्वतःच्या कृतीतून साधकांवर केले आहेत. त्यामुळे प्रत्येक साधक आपल्या क्षमतेनुसार सतत सेवा आणि साधना यामध्ये मग्न असून आनंदी असतो.
६. साधना
६ अ. आश्रमातील साधक ‘ईश्वरप्राप्ती आणि हिंदु राष्ट्र स्थापन करणे’ हे ध्येय उराशी बाळगून विहंगम मार्गाने साधना करण्यात प्रयत्नरत असणे : येथील साधक लोकांना दाखवण्यासाठी म्हणून काही करत नाहीत. बाहेरच्या वातावरणातील मानसन्मान, प्रसिद्धी इत्यादी लोकेषणेच्या गोष्टींना येथे काहीच स्थान नाही. आश्रमातील साधक गुरुमाऊलीने प्रवचने आणि दैनिक या माध्यमांतून वेळोवेळी सांगितलेल्या अष्टांग साधनेनुसार साधना करून ‘ईश्वरप्राप्ती’ आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापन करणे’ हे ध्येय उराशी बाळगून गुरुमाऊलींना अपेक्षित अशी विहंगम मार्गाने प्रगती करण्याच्या प्रयत्नात असतात.
६ आ. मनाचा अभ्यास करणे आणि स्वभावदोष दूर करणे, यांसाठी मार्गदर्शन केल्याने अनेक साधकांना अनेक ईश्वरी गुणांची प्राप्ती होऊन ईश्वरप्राप्तीकडे त्यांची वाटचाल होणे : आश्रमात व्यष्टी साधनेचा आढावा, भावसत्संग, विविध धार्मिक विषयांच्या संदर्भात कार्यशाळा इत्यादींचे आयोजन केले जाते. यांत ‘मनाचा अभ्यास कसा करावा ? मन निर्मळ कसे करावे ?’ यांविषयी शिकवले जाते आणि मनातील भय, नकारात्मकता, भ्रम, चिंता, निराशा इत्यादी अनेक स्वभावदोष दूर करण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते. यामुळे साधकांच्या मानसिक व्याधी तर नष्ट होतातच; परंतु अनेक साधकांना अनेक ईश्वरी गुणांची प्राप्ती होऊन त्यांची ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल होते.
साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व यांमुळे आश्रम म्हणजे चैतन्ययुक्त वैकुंठलोकच !आश्रमात साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे वास्तव्य आणि सर्व देवतांचे अस्तित्व असल्यामुळे चैतन्ययुक्त अशा या वैकुंठलोकास भेट देण्यास आलेली कोणतीही व्यक्ती परत जातांना गुरुकृपेने कृतकृत्य होऊन स्वतःसमवेत येथील चैतन्य आणि आनंद घेऊन जाते. ती गुरुमाऊलीच्या प्रीतीने भारावून गेलेली असते. त्यामुळेच आपला हा रामनाथी आश्रम म्हणजे जगाच्या पाठीवरील एक अद्वितीय स्थान झाले आहे. |
७. सहजभावात असणार्या सनातनच्या संतांची वैशिष्ट्ये
७ अ. सनातनचे संत सहजभावाने वावरत असून सतत सेवेत मग्न असणे आणि संत असल्याचा त्यांच्यात अहंभाव नसणे : गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच कृपेने साधक प्रयत्न करून पुढे शिष्य, संत आणि सद्गुरु पदापर्यंत पोचले; परंतु उन्नत साधक अणि संत झाल्यावरही ते सर्व साधकांमध्ये इतक्या सहजभावात वावरतात की, ‘ते उन्नत साधक किंवा संत आहेत’, हे सांगितल्यावरच इतरांना समजते. इतकेच नव्हे, तर संत झाल्यावरही ते सतत सेवेत मग्न असतात. ‘मी संत आहे’, असा आहंभाव त्यांच्यामध्ये नसतो.
७ आ. संतांनी साधकांवर निरंतर प्रीती, चैतन्य आणि आनंद यांचा वर्षाव करत वेळोवेळी त्यांच्यासाठी निरपेक्षतेने नामजपादी उपायही सांगणे : आश्रमात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला अनेक संतांचे दर्शन होते. त्यांच्याकडून आपल्यावर निरंतर प्रीती, चैतन्य, आणि आनंद यांचा वर्षाव होत असतो. त्यांच्या दर्शनानेच चैतन्य मिळून आपल्याला आध्यात्मिक लाभ होत असतात. ते प्रत्येक साधकाला साहाय्य करण्यास सदैव तत्पर असतात. ते साधकांसाठी वेळोवेळी नामजपादी उपायसुद्धा करतात. कुणीही साधक त्यांना केव्हाही स्वतःच्या आध्यात्मिक त्रासावर उपाय विचारू शकतो. संतांना साधकांकडून काहीच अपेक्षा नसून ते साधकांसाठी सर्व काही निरपेक्षभावाने करत असतात.
७ इ. बाहेरच्या वातावरणात संतदर्शन किंवा संतांचे प्रवचन ऐकणे यांसाठी पुष्कळ आटापिटा करावा लागणे आणि यावरून आश्रमातील संतांची महानता लक्षात येणे : याउलट बाहेरच्या वातावरणात संतदर्शन होण्यासाठी किंवा त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी पुष्कळ आटापिटा करावा लागतो. माझ्या माहितीप्रमाणे काही संत त्यांच्या प्रवचनासाठी शुल्कही (फीसुद्धा) आकारतात. मी एकदा आमच्या गावी (संभाजीनगर) एक संतांच्या प्रवचनाला गेले होते. तेथे प्रवचनाची वेळ संध्याकाळी ७ ते ९ अशी होती; परंतु तेथे आलेले मंत्री, आमदार, खासदार आणि समाजातील प्रतिष्ठित अन् महत्त्वपूर्ण व्यक्ती यांच्याकडून त्या संतांना पुष्पहार, शाल आणि श्रीफळ अर्पण करण्यात अन् त्यांची प्रशंसा करण्यातच अक्षरशः एक घंटा व्यय झाला. ‘प्रवचन कधी चालू होईल ?’, याची वाट बघण्यात आणखी एक घंटा गेल्यावर मी कंटाळून घरी आले. २ घंटे वेळेचा आणि (प्रवचनस्थळ ७ – ८ कि.मी. दूर असल्याने) जाण्या-येण्यात झालेला २०० रुपये धनाचा व्यय करूनही आम्हाला काही आनंद मिळाला नाही.
यावरून आपल्या आश्रमातील संतांची महानता लक्षात येते. ते साधकांना साहाय्य करण्यास सदैव तत्पर असतात. ते त्यांचा पूर्ण वेळ देऊन साधकांना निष्कामभावाने साहाय्य करतात. त्यांच्यामध्ये अहंचा लवलेशही नसतो. या संतांमुळे येथे सर्व साधकांना (बाहेरच्या वातावरणात दुर्मिळ असणारा) आनंद आणि चैतन्य सतत, सहजच अन् विनामूल्य मिळत असते.
हे गुरुदेवा, हे श्रीकृष्णा, आश्रमात आल्यापासून आपल्याच कृपेने सातत्याने असे विचार मनात येत असत. काही साधकांनी ते लिहून देण्यासाठी मला प्रेरणा दिली. या लेखाचे टंकलेखन करतांना अनेक वेळा आपण साधकांसाठी घेतलेल्या अपार कष्टांची जाणीव होऊन आणि साधकांची प्रीती आठवून माझे मन गहिवरून आले अन् माझी भावजागृती झाली. भावजागृतीसाठीच आपण माझ्याकडून हे लिखाण लिहून घेतलेत, त्यासाठी मी आपल्या चरणी अनंत कोटी वेळा कृतज्ञ आहे. ‘अशीच अखंड कृपादृष्टी माझ्यावर असू द्या आणि आपण साधकांसाठी करत असलेल्या कष्टांची मला जाणीव असू द्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. सविता तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१७.८.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |